लोहा येथील धानोरा (म) ते गांधीनगर दरम्यान नदीवर पुल व रस्ता मागणीसाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न लाक्षणिक आंदोलन; आंदोलनादरम्यान विवाहितेस प्रसव वेदना होऊ लागल्यामुळे बैल गाडीतून रुग्णालयाकडे जीवघेणा प्रवास ( पाहा व्हिडिओ )

766

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड  |

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असताना धानोरा (म) गट ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर या जवळपास तीनशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला अद्यापपर्यंत रस्ताच नाही. शालेय विद्यार्थी, आजारी रुग्ण, वृध्द, महिला यांना कमरे एवढ्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्यात तर गांधीनगरचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे धानोरा (म) ते गांधीनगर असा अडीच किमी अंतराचा रस्ता व नदीवर पुल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महात्मा गांधी जयंती दिनी दि.२ रोजी रविवारी अर्धनग्न लाक्षणिक आंदोलन केले. दरम्यान आंदोलन स्थळाजवळून गांधीनगर येथील एका विवाहितेस प्रसव वेदना होऊ लागल्यामुळे बैल गाडीतून रुग्णालयाकडे घेवून जात असताना दिसून आले.

लोहा तालुक्यातील धानोरा (म) ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर गट ग्रामपंचायत आहे. धानोरा (म) गावापासून पश्चिमेला जवळपास दोन ते अडीच किमी अंतरावर गांधीनगर, घोडकेवाडी या वस्त्या आहेत. सदर गाव वस्त्याकडे जाण्यासाठी अद्याप पर्यंत मार्गच नाही. तसेच नदी पलीकडे धानोरा (म) येथील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. पावसाळ्यात मुस्लिम समाजातील अंत्ययात्रा पाण्यातून चालत न्यावी लागते. मागील ५० ते ६० वर्षांपासून नागरिक स्वातंत्र्यात असून देखील पारतंत्र्यात जीवन व्यतीत करत असल्याचे तेथील परिस्थिती वरून दिसून येत आहे. धानोरा (म) येथून गांधीनगर येथे जाण्यासाठी अद्याप पर्यंत नदीवर पूल नाही तसेच रस्ता देखील नाही. सदर प्रलंबित असलेला पुल व रस्ता काम करून देण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी महात्मा गांधी जयंती दिनी नदी पात्रात उतरून अर्धनग्न लाक्षणिक आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गांधी जयंती निमित्त पाण्यातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी आंदोलन कर्त्यानी विविध घोषणा दिल्या व राज्य सरकार व प्रशासन गांधीनगर वासियांकडे करत असलेल्या दुर्लक्षा बद्दल तीव्र निषेध केला.

सदरील आंदोलन सुरू असतानाच गांधीनगर येथील एका विवाहितेस प्रसव वेदना होत असल्यामुळे विवाहितेच्या कुटुंबीयांनी तीस नदीपात्रातून बैल गाडीत जीवघेणा प्रवास करत लोहा ग्रामीण रुग्णालयाकडे घेवून जात असल्याचे दिसून आले. नदीवर पूल व रस्ता नसल्यामुळे गांधीनगर येथील नागरिकांना दुचाकी, चारचाकी वाहने नदीच्या अलीकडेच उभे करून अडीच किमी अंतर पायी चालत जावे लागते. विद्यार्थी, रुग्ण, वृध्द, महिला यांना या सर्व बाबींचा अधिक त्रास सोसावा लागतो आहे. परिसरातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे, खते, बियाणे, उत्पादन केलेला फळ व पालेभाज्या, दुध आदी पायी रस्ता तुडवत अथवा बैल गाडीतून ने – आण करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ पुल व रस्ता काम करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.

सदर आंदोलनात बालाजी नागरगोजे, ज्ञानोबा नागरगोजे, बाबुराव केंद्रे, नामदेव भुजबळ, दत्तात्रय माटोरे, संभाजी नागरगोजे, लक्ष्मण नागरगोजे, बळीराम नागरगोजे, शामराव येमे, मंचक येमे, रहीम शेख, बालाजी पाटील कदम, बालाजी पिंपळपल्ले, आनंदा कोरे, सरुबाई केंद्रे, कलूबाई दहिफळे, तुळसाबाई नागरगोजे, मिठाबाई नागरगोजे, लक्ष्मीबाई शेळके, सरुबाई केंद्रे, माणिका केंद्रे आदींसह अबाल वृध्द बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी चौधरी, लोहा पोलिस ठाण्याचे बगाडे यांची प्रामुख्याने हजेरी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.