अर्धापुरातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरून जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी – गटनेते बाबुराव लंगडे
अर्धापूर, नांदेड –
येथील ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन होऊन दीड महिना उलटला तरी पण रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही.ग्रामीण रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच रूग्णालयाच्या परीसरात नगरपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णालयाच्या रस्त्यावर पथदिवे लावावे अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपंचायत गटनेते बाबुराव लंगडे यांनी केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार रुग्णसेवा मिळावी यासाठी शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय सुरू केले आहे. अद्याप रुग्णालयातील विविध पदे रिक्त असल्याने तसेच अनेक कर्मचारी डेपोटेशनवर असल्यामुळे तालुक्यातील व शहरातील जनतेला मूलभूत आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. रिक्त पदे त्वरित भरावे अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरात रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था नसल्याने भितीदायक वातावरणात नागरिक व कर्मचाऱ्यांना रात्र काढावी लागत आहे तर नगरपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी नगरपंचायत गटनेते बाबुराव लंगडे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.