नांदेड जिल्ह्यात ऊसतोड कामगार व मोलमजुरी करणारी महिला बनली सरपंच !

349

नांदेड –

नांदेड जिल्ह्यात 181 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यातील 160 ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतमोजणी झाली. यामध्ये अनेक धनदांडग्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे तर प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांच्या हाती कारभार दिला आहे.

जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पळशी या गावाने या निवडणुकीत वेगळा आदर्श घालून दिला आहे. ऊसतोड महिला कामगार असलेल्या व मोलमजुरी करणाऱ्या राजश्री नामदेव गोटमुकले या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.यंदाच्या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात आल्यामुळे पळशी ग्रामस्थांनी राजश्री यांना थेट सरपंचपदी विराजमान केले आहे.

गावकारभारी होण्यासाठी गावातील धनदांडग्यांनी या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओतला आहे. मात्र, मतदारांच्या प्रामाणिकतेमुळे ऊसतोड कामगार असलेल्या एका महिलेला लोहा तालुक्यातील पळशी ग्रामस्थांनी सरपंच पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला असून, ग्रामस्थांनी नवा आदर्श घालून दिला आहे.रोजमजुरी करून मुलांचे शिक्षण आणि कुटुंब सांभाळणारी ही महिला आता गावचा कारभार पाहणार आहे.

गावाने माझ्यावर विश्वास दाखवला आता विकास करण्याचे ध्येय

मी ऊसतोड कामगार आहे. रोजमजुरीच्या पैशातून मुलांचे शिक्षण पूर्ण करून घर चालविते. या निवडणुकीत ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकला व सरपंचपदी माझी निवड केली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण आहे. ग्रामस्थांच्या विश्वासावर खरे उतरण्याचा प्रयत्न करणार असून, गावाचा विकास हेच माझे ध्येय आहे.

राजश्री गोटमुकले, सरपंच

Leave A Reply

Your email address will not be published.