नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काही अंतरावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरातील पिंड सरकून अज्ञात चोरट्यांनी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना दि.6 मंगळवारी रात्री घडली. स्थानिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागात पोलिस गस्त वाढवून घटनेचा छडा लावून हे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे चोरट्यांनी गुप्तधनाच्या लालसेपोटी देवालाही सोडले नाही, अशी चर्चा परिसरात होत आहे.
नायगाव तालुक्यातील कृष्णूर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसमोर काही अंतरावर पुरातन महादेव मंदिर आहे. या मंदिरात भाविक पूजाअर्चेसाठी येतात. या मंदिराशी भाविकांच्या श्रद्धा जुडलेल्या आहेत. बुधवारी सकाळी मंदिरातील महादेव पिंड हलवून काही लोकांनी खोदकाम करून मोठा खड्डा केल्याचे दिसले. अज्ञात चोरट्यांनी गुप्तधनाच्या लालसेपोटी मंगळवारी मध्यरात्री मंदिरात शिरून मंदिरातील महादेव पिंड हटवून जवळपास 10 फूट खड्डा खोदला असून, शेजारीच लोखंडी घमेले, कुदळ व फावडे आढळून आले आहेत.
मात्र, खोदकाम साहित्य जागेवरच ठेवून चोरटे पसार झाले आहेत. मंदिराचे असे अवैधरीत्या खोदकाम करून मंदिराचा अवमान करून भाविकांच्या भावनेशी खेळ खेळणारा हा प्रकार असून या प्रकारामुळे मंदिराशी आस्था जुळलेले भाविक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात पोलिस गस्त वाढवावी, तसेच महादेव मंदिराच्या पिंडीखाली खोदकाम करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.