नांदेडमद्धे चोरट्यांनी तीन दुकानांसह घर फोडले, 18 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
नांदेड –
जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून शहरात देखील दरोडा, जबरी चोरी, लूटमार अशा घटनेत मोठी वाढ झाली आहे. दि.8 जून बुधवारी मध्यरात्री वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन दुकाने व एक घर फोडून रोख रक्कमेसह जवळपास 18 लाख 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास करून पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे.
चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्याही चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. पोलिसांचे घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. कोणतीही पोलीस कारवाई होत नसल्याने चोरटे मोकाटच फिरत आहेत. दरम्यान, नांदेड शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून वजिराबाद बाजारपेठेकडे पाहिले जाते. मात्र याच परिसरात घरफोडी, दरोडे यासारखे गुन्हे घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात दि.8 जून रात्री ते 9 जूनच्या पहाटे दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी वजिराबाद भागातील कृष्णा बॅग हाऊस हे दुकान फोडून गल्ल्यातील रोख 3 हजार रुपयाची रक्कम लंपास केली.तर डॉ.भालेराव यांच्या जिजामाता हॉस्पिटलच्या बाजूच्या गल्लीतील मराठवाडा इलेक्ट्रीकल्स दुकानाचे शटर उचकून चोरट्यांनी 12 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे तसेच अर्बन क्लॉथ या दुकानातून 4 हजार रुपयांची रोकड चोरली.
या तिन्ही दुकानातून जवळपास 20 हजारांच्या रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. तर याच रात्री संधी साधून शहरातील गवळीपुरा भागातील एक घर फोडून चोरट्यांनी कपाटातील जवळपास 18 लाखांच्या मुद्देमालासह ऐवजावर हात साफ केला आहे.
दुकान फोडी संदर्भात मराठवाडा इलेक्ट्रिकलचे मालक इंद्रजीत खियाणी यांनी तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान वजिराबाद पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गजबजलेल्या भागात चोरट्यांनी हैदोस घालून पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.