अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक; ऑस्ट्रेलियाचा केला 96 धावांनी पराभव

183

नवी दिल्ली-

भारताने ऑस्ट्रेलियाला 96 धावांनी धूळ चारत 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम फेरीत सलग चौथ्यांदा आणि आतापर्यंत आठव्यांदा धडक मारली. आता शनिवारी होणाऱ्या विश्वचषक फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे.

भारताच्या या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने कर्णधारास साजेशी खेळी करून शतक झळकावले तर शेख रशिदनं 94 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीद या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर भारताला 50 षटकांत पाच बाद 290 धावांची मजल मारता आली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालने तीन आणि निशांत संधूने दोन फलंदाजांना बाद केले.

भारतीय संघाच्या 12.3 षटकांत 2 बाद 37 अशी धावसंख्या असताना कर्णधार यश धुल मैदानावर उतरला आणि त्याने शेख रशिदच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुलाई केली. या दोघांच्या भागीदारीच्या बळावर भारताने 290 धावांचा डोंगर उभा केला. यश धुलने शतकी खेळी करताना इतिहास रचला, तर रशिदचे शतक केवळ 6 धावांनी हुकले.

अंगक्रीश रघुवंशी 6 धावा व हर्नूर सिंग 16 धावा हे सलामीवीर स्वस्तात बाद होऊन माघारी परतल्यानंतर यश व रशिद यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. यशने 110 चेंडूंत 10 चौकार 1 षटकारासह 110 धावा काढल्या आणि तो बाद झाला. त्यापाठोपाठ रशिदही 108 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 94 धावांवर बाद झाला. दिनेश बानाने 4 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह झटपट नाबाद 20 धावा करून संघाला 290 धावांपर्यंत पोहोचवले. भारतीय संघाने अखेरच्या 10 षटकांत 108 धावा काढल्या.

दरम्यान,19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधाराने शतक झळकावल्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी विराट कोहलीने 2008 मध्ये वेस्ट इंडिज आणि उन्मुक्त चंदने 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावले होते. हे तिघेही खेळाडू दिल्लीचे आहेत आणि 2008 व 2012 मध्ये भारताने विश्वचषक आपल्या नावावर केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.