कुर्डुवाडी पनवेल- नांदेड, गाडी क्र.17613 रेल्वेगाडीचा वेग कमी असताना दोन वेगवेगळ्या रेल्वेच्या बोगीच्या खिडकीतून हात टाकून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर साहित्य असे एकूण 2 लाख 83 हजारांचा ऐवज लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदरील घटना गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील ढवळस येथील रेल्वे स्थानकाच्या आऊटर सिग्नलनजीक ही घटना घडली. याप्रकरणी शिल्पा कमल मोदी, रा.देवी वार्ड, काळा मारुती मंदिर ता.पुसद, जिल्हा यवतमाळ व अक्षय अनंत मोरे, रा. १३८ प्रथम बंगलो सोसायटी, पोलीस लाईन पाठीमागे वाकड, पुणे यांनी कुर्डुवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्पा मोदी, या प्रवासी महिला पनवेल -नांदेड गाडी क्र. 17613 या गाडीने बोगी क्र. एस 2 बर्थ क्र. 41 या डब्यातून लोणावळा ते नांदेड असा प्रवास करीत होत्या. त्या खिडकीच्या बाजूला डोके करुन झोपून प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनमधील पेंडलसह अंदाजे रक्कम 2 लाख पन्नास हजारांची सोन्याची चेन ओढून चोरट्याने पळवून नेली. दरम्यान, याच गाडीतील अक्षय मोरे हे चिंचवड ते पूर्णा असा प्रवास करीत होते. बोगी क्र. एस 10, बर्थ क्र. 7 या जागेवरून प्रवास करत असताना डेल कंपनीच्या काळ्या रंगाच्या बॅगेतून इअरबँड 900 रु, वायफाय डिव्हाइस 2000 रु, ॲपल इअरबँड 12 हजार 500 आणि इतर साहित्य असे एकूण 33 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या दोन्ही घटनेतील दोघांचा मिळून एकूण 2 लाख 83 हजार 900 रुपयांचा ऐवज या घटनेत अज्ञात चोरट्याने लुटला आहे.