सत्य, न्याय आणि निष्ठेने पत्रकारिता झाली पाहिजे -दूरदर्शनच्या निवेदिका मनाली दीक्षित

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव

595

नांदेड –

आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात झोकून देऊन काम केले पाहिजे.पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने निर्भीडपणा आपल्या अंगी बाळगत सत्य, न्याय आणि निष्ठेने पत्रकारिता केली पाहिजे असे मत दूरदर्शनच्या निवेदिका मनाली गिरीश दीक्षित यांनी व्यक्त केले. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने आनंद सागर मंगल कार्यालयात दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या अभिवादनार्थ जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, माजी आ.गोविंद केंद्रे, आ.राम पाटील रातोळीकर, आ.राजेश पवार, माजी आ.सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, रामदास पाटील सुमठाणकर, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन उमरेकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शेवडीकर, केशव घोणसे पाटील आदी मान्यवरांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना मनाली दीक्षित म्हणाल्या की, लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे काम माध्यमांमुळे होते आहे. लोकशाहीच्या तीन स्तंभाच्या कामावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात माध्यम करीत आहेत.वृत्तपत्रांवर विश्वासार्हता असल्याने वर्तमानपत्रातील पत्रकारांवर जनतेचा आजही विश्वास आहे.मात्र, या क्षेत्रात मुलींची संख्या वाढली पाहिजे. ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेचा मुक आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींनी पत्रकारिता क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळले पाहिजे . आपल्या लेखणीत प्रचंड ताकद असल्याने त्या ताकदीचा उपयोग समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्याचा गौरव करत नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये इतका लोकप्रिय असणारा एकमेव नेता खा.चिखलीकर असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले.

आ.राम पाटील रातोळीकर बोलताना म्हणाले की, खा.चिखलीकर यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाल्यास निश्चितच नांदेड जिल्ह्याचा, मराठवाड्याचा आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होईल. आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत होईल. तसेच
केशव घोणसे पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, राजकारणी आणि माध्यम एकत्रितरित्या आणि समन्वयातून काम केल्यास समाजाचे हित नक्की होईल. आ.चिखलीकर यांनी ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जुळवून ठेवली आहे त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी आहे. आजचा सन्मान सोहळा हा खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा गौरव आहे असे मला वाटते.

सु.मा.कुळकर्णी आपल्या मनोगतात म्हणाले की, ज्यांचा जनसंपर्क मोठा असतो ते माणसं यशस्वी होतात याचे उदाहरण खा.चिखलीकर आहेत. ते ज्या ज्या पक्षात होते त्या त्या पक्षात त्यांचा जनसंपर्क मोठा राहिला आहे. ते खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत.महानगराध्यक्ष प्रवीण साले म्हणाले की, लोकशाही समृध्द करण्याचे काम माध्यम करत आहेत. माध्यमं लोकशाहीचा आरसा आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांनी आता मुंबई, दिल्लीला गवसणी घालण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील प्रश्न , समस्या मुंबई, दिल्ली दरबारी पोहचवा.त्यामुळे पत्रकारांनी आता भूमिका घेऊन लिहिण्याची गरज आहे असे सांगून स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या असेही ते म्हणाले.

व्यंकट गोजेगावकर यावेळी म्हणाले की, लोकशाही जीवन ठेवण्याचे काम पत्रकार करीत आहेत. समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव हा आमच्यासाठी सौभाग्याचं क्षण आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक तालुकास्तरावर पत्रकार भवन निर्माण करण्यात यावे.पत्रकारांच्या पाल्याला शैक्षणिक सुविधा शासनाकडून मिळाल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना आ.राजेश पवार म्हणाले की, माझ्या जीवनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. वृत्तपत्र मालकांनी ग्रामीण भागात आगाऊ माणसांची वार्ताहर म्हणून नियुक्ती केली.चार दोन बातम्या विरोधात छापून आणून जाहिरात काढतात ते त्यांचाही पेपर वाचत नसतील अशी गंभीर टीका केली.माजी आमदार गोविंद केंद्रे म्हणाले की देशात विरोधी पक्षाची भूमिका खऱ्या अर्थाने पत्रकार बजावत आहेत. ही भूमिका आणि विश्वासाहर्ता कायम जपावी. डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर म्हणले की, लोकशाहीला समृद्ध ठेवत असतानाच पत्रकारांनी समाजाच्या पुनर्बांधणीसाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. निष्ठेने काम करत असताना एक विशिष्ट भूमिका घेऊन पत्रकारिता करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

भाजपा, शिंदे आणि केंद्र सरकार पत्रकारांच्या पाठीशी  -खा. चिखलीकर

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या पाठीशी राज्यातील भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार खंबीरपणे उभे आहे. शिवाय केंद्रातील भाजपा सरकार पत्रकारांच्या पाठीशी उभे असल्याने पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून त्याच्या कुटुंबातील एकास शासकीय सेवेत नोकरी देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच वारिशे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापन केली आहे. लोकशाहीला बळकट करणाऱ्या आणि समाजाला नवीन परिवर्तनाच्या वाटेवर नेणाऱ्या पत्रकारांनी निष्ठेने काम करावे, निश्चितपणे कोणत्याही संकटात भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि मी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आपल्या पाठीशी उभा आहे असेही ते म्हणाले. देशाची काळजी कशी करावी,140 कोटी नागरिकांचे हित कसे बघावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करताना शिकता आले. त्यामुळे आपणासही दैनंदिन जीवनात काम करत असताना आपणासही काही ना काही नवीन शिकता आले पाहिजे नव समाज निर्मितीसाठी काही प्रयत्न करता आले पाहिजेत असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.