कर्नाटक परिवहन विभागाची बस आणि टेम्पोची समोरासमोर भीषण टक्कर; दोन जण जागीच ठार

राष्ट्रीय महामार्गावरील जानापुरी कॅम्पजवळील घटना

384

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड –

नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. जुना डांबरी रस्ता उखडून टाकला असल्याने अंतरा अंतराने महामार्गाचे सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने जाणारी व येणारी वाहतूक एकाच रस्त्यावरून एकेरी सुरू आहे आणि त्यामध्ये वाहनाचा वेग अफाट असल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

महामार्गावरील जानापुरी कॅम्प नजीक कर्नाटक परिवहन महामंडळाची बस व छोटा हत्ती या दोन भरधाव वेगातील वाहनांमध्ये जबर टक्कर होऊन त्यात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना दि.4 रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

नांदेड बसस्थानकातून प्रवाशी घेवून कर्नाटक महामंडळाची नांदेड गुलबर्गा बस क्र. के ए 38 एफ 1021 ही दि.4 रोजी बुधवारी दुपारी लोह्याकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील जानापुरी कॅम्प नजीक लोह्याकडून नांदेडकडे भरधाव वेगात जाणारा छोटा हत्ती क्र. एम एच 26 ए डी 8515 यांच्यात दुपारी अडीच वाजताच्या सुमारास समोरासमोर भीषण टक्कर झाली. त्यात छोटा हत्ती वाहनातील राम लक्ष्मण चींतलवार (वय 38) व धोंडीबा लक्ष्मण केंद्रे (वय 55) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघातात छोटा हत्ती वाहनाचा चक्काचूर झाला.

घटनास्थळास सोनखेड पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला तसेच काही जखमींना तत्काळ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रसंगी एसटी कर्मचारी बनसोडे, अंगद कदम, उत्तम कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन इतर जखमींना मदत पुरवली. अपघाताची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, पोउपनि चंदनसिंह परीहार, पो. काँ. श्याम आदींनी भेट दिली. दोन्ही मृतक हे तरोडा भागातील रहिवासी असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.