नांदेडच्या ग्रामीण पोलीस शिपायाची तऱ्हाच न्यारी, रोख व फोन पे द्वारे उघड झाली लाचखोरी; पोलीस शिपायासह एक खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नांदेड-
वाळूचे टिप्पर नियमितपणे चालू देण्यासाठी 21 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई शिवाजी पाटील, वय 35 आणि एक खाजगी इसम मारोती गोविंदराव कवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोन पे ॲपने 7 हजार रुपये तर 14 हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तक्रारदाराचा वाळु विक्री व्यवसाय असल्यामुळे 21 हजार रुपये प्रतिमहिना देण्याची मागणी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस शिपाई शिवाजी पाटील यांनी केली होती. सोमवारी 14 हजार रुपये खाजगी इसम मारोती कवळे यांच्यामार्फत 6 जून रोजी स्वीकारले. लाचलुचपत विभागाचे अधिकारी पथक शिवाजी पाटील आणि मारोती कवळे यांच्या मागावर होते. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.6 जून 2022 रोजी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील, वय 35 व्यवसाय नोकरी, पोलीस शिपाई/2929, पोलीस स्टेशन, नांदेड ग्रामीण, नांदेड. रा.ह.मु.मदन पाटील यांचे घर, संकेत हॉस्टेल जवळ, ओंकारेश्वर नगर, नांदेड मूळ रा.पाथरड ता. मुदखेड जि.नांदेड.आणि एक खाजगी इसम मारुती गोविंदराव कवळे, वय 34 व्यवसाय शेती, रा.इळेगाव ता. उमरी जि.नांदेड हे दोघे यातील आरोपी पोलीस अंमलदार शिवाजी पाटीलने, तक्रारदार यांना त्यांचे 3 वाळूचे टिप्पर नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या टिप्परवर यापुढे कारवाई न करण्यासाठी, प्रति टिप्पर 7 हजार रुपये प्रमाणे तीन टिप्परचे 21 हजार रुपये प्रति महिना अशी मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लगेच पडताळणी केली आणि 14 हजार रुपये रोख स्वीकारताना दोघांना अटक केली. त्यापैकी 7 हजार रुपये यापूर्वी फोन पे ॲपद्वारे स्वीकारले असून, उर्वरित 14 हजार रुपये दि. 6 जून रोजी खाजगी इसमाच्या हाताने स्विकारली.
ही सापळा कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उप अधिक्षक राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधिक्षक अशोक इप्पर, नानासाहेब कदम व पोलीस निरिक्षक जमीर नाईक, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर, सचिन गायकवाड, मारोती मुलगिर आणि चक्रधर गजानन राऊत यांनी पूर्ण केली. या प्रकरणाचा पुढील तपास अशोक इप्पर हे करत आहेत.
ही माहिती प्रसारमाध्यमांकडे देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम/एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. कार्यालय दुरध्वनी – 02462 253512, राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि.नांदेड मोबाईल नंबर – 7350197197, टोल फ्री क्रमांक 1064 वर माहिती द्यावी.