लोहा तालुक्यात लम्पी आजारावरील लसीकरणास प्रारंभ – डॉ.आर.एम.पुरी
लोहा, नांदेड |
आजघडीला पशुधनांमध्ये होणारा लम्पी आजाराचा संसर्ग पाहता पशुवैद्यकीय विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली असून जनावरांना लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आले असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरांना लसीची मात्र देण्यात येत असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.एम.पुरी यांनी दिली.
तालुक्यातील चितळी, पिंपळदरी व हिराबोरी तांडा या गावात प्रति गाव एक पशुमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आली आहेत.पशूचे रोग नमुने रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविण्यात आले असून इतर पशूंना या आजाराची लागण होऊ नये यासाठी ५ किमी अंतरातील गावामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गौंडगाव, हिराबोरी तांडा, पिंपळदरी, हिंदोळा, मस्की, चितळी, काबेगाव, देऊळगाव, बेरळी, धानोरा (म), सुनेगाव, सोनमंजारी, सुगाव, हिप्परगा, पोलेवाडी, मंगरूळ, हळदव आदी गावात लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी आजाराने तालुक्यात एकाही पशुचा मृत्यू झाला नाही.आढळून आलेल्या बाधित पशुवर उपचार सुरु आहे.
लम्पी आजारची लक्षणे दिसताच तालुक्यातील पशुपालक यांनी घाबरून न जाता त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास विभागाकडून करण्यात आले आहे.लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सेवादाता यांच्या सहकार्याने तालुक्यातील अनेक गावात एका दिवसात जवळपास ४ हजार ८०० बैलवर्ग पशूना लसीकरण करण्यात आले.
लसीकरण यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी डॉ.प्रकाश हाके, डॉ.वसुधा मुसळे, डॉ.सतीश केंद्रे, डॉ.उपेन्र्द गायकवाड, डॉ.सुनील गिरी, डॉ.बालाजी तेलंगे, डॉ. सुरेश कोकरे, डाखोरे, जमदाडे, गोरे, मनोहर कुंभार, जाल्देवर, पवार, अजय झाडे तसेच खाजगी सेवादाता धम्मानंद तोंडारे, गोविंद राऊत, शेख सिकंदर, विनोद पुरी, मुसळे, माने, भालके, मल्हारे, राठोड सोहेल, कानवटे, खाडे, चोंडे वादेबाले, हाबगुंडे, मुंडे, माधव कदम, तोंडचिरे आदींनी लसीकरण मोहिमेत उस्फूर्त सहभाग नोंदवला.