लोह्यातील अनेक शासकीय कार्यालयांना रविदास महाराज जयंतीचा विसर
कार्यालय प्रमुखांची शासन परिपत्रकाला केराची टोपली
प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड
राष्ट्रसंत श्रीगुरु रविदास महाराज यांची दि.16 रोजी जयंती होती. मात्र शासन अध्यादेश असताना देखील लोहा शहरातील अनेक शासकीय कार्यालयात रविदास महाराज जयंती साजरी करण्याचे धारिष्ट्य कार्यालय प्रमुखांनी दाखविले नाही. सदर बाब दलित समाजातील तरुण कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तहसील कार्यालयात धाव घेवून संबंधितांना जाब विचारत जयंती साजरी करण्यास भाग पाडले
शासनाने दि.14 रोजी शासन परिपत्रक काढून दि.16 रोजी सर्वच कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती काढण्याचे आदेश निर्गमित केले. डिसेंबर 2021 च्या काढण्यात आलेल्या जुन्या शासन पत्रिकेत बदल करून याच फेब्रुवारी महिन्यात नवीन परिपत्रक काढून त्यामध्ये 23 ऐवजी 16 फेब्रुवारी रोजी सर्वच शासकीय कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात रविदास जयंती साजरी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र जवळपास सर्वच कार्यालय प्रमुखांनी शासन परिपत्रकाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. लोहा तहसील कार्यालयात शासन आदेश असतानाही संत रविदास महाराजांची जयंती साजरी केली जात नसल्याची माहिती दलीत समाजातील चर्मकार संघाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तहसील कार्यालयात धाव घेत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना धारेवर धरत जाब विचारला. सुरुवातीला तहसीलदार मुंडे व एका पेशकराने उडवाउडवीची उत्तरे देत प्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेताच तहसीलदार नरमले व दुपारी चार नंतर संत रविदास महाराज यांची प्रतिमा कार्यालयात ठेवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, चर्मकार संघाचे लक्ष्मण फुलवरे, नगरसेवक दत्ता वाले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आनेराव, सुरेश गजभारे, सोनू बनसोडे, पेशकर एस.आर. वाळूकर, शरद मंडलिक, सातपुते, रतन हंकारे, बालाजी वाघमारे, दत्ता फुलपगार, वैजनाथ देशमाने, सोमनाथ खरात, बंटी देशमाने, संतोष बनसोडे, किशन खरात, गिरजा फुलवरे सह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शासकीय कार्यालयात रविदास जयंती साजरी न करणाऱ्या कार्यालय प्रमुखावर कार्यवाही करणार – फुलवरे
देश ही संतांची भूमी आहे. देशात संत, महापुरुष यांची जयंती साजरी करून त्यांचे विचार, प्रेरणा सतत समाजापुढे राहावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकार शासन परिपत्रक काढून महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याचे आदेश निर्गमित करते. मात्र प्रशासनातील काही कारभारी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचा प्रकार रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुढे आला आहे. चर्मकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना जयंती करण्यास भाग पाडले असले तरी पंचायत समिती कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूसंपादन व भूमी अभिलेख कार्यालय, महावितरण तसेच अनेक कार्यालयात रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली नाही. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित कार्यालय प्रमुखाकडे तक्रार करणार असल्याचे चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण उर्फ लक्की फुलवरे यांनी सांगितले.