मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ थंडावली ! क्रांतीवीर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचं निधन; वयाच्या 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नांदेड –
मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकिर्द गाजवली. त्यामुळेच, शेकापमध्ये असतानाही त्यांचा कामाचा आणि राजकीय उंचीचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा होता.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता.जनतेवरचं त्यांचे प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले.
1975 साली आणीबाणीचा विरोध करताना 14 महिने कारावास भोगला. विशेष म्हणजे आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले. मात्र, 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. मोठ्या मनाने त्यांनी तो पराभव स्वीकारला होता. शरद पवारांचा भरस्टेजवर मुका घेण्याचे धाडसही त्यांनी नांदेडमद्धे एका कार्यक्रमातून दाखवून दिले होते.
विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ख्याती होती.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.
उद्या दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड, कंधार येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघणार असून दुपारी 4:15 वाजता क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने राज्याची न भरून निघणारी हानी
– खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे. भाई केशवरावजी धोंडगे यांनी लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे अनेक वेळा नेतृत्व केले तर संसदेत खासदार म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली होती. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारून मोठी शैक्षणिक चळवळ निर्माण केली होती. आयुष्यभर एकाच विचारसरणीशी बांधिल राहिलेल्या भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या जीवनातील तत्व कायम पणे जपली होती. शंभरी पार करणाऱ्या भाई डॉ.धोंडगे शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्वही मोठे हिमतीने आणि सक्षमपणे केले होते. नांदेड आणि मराठवाड्यातील कामगार चळवळीचा एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.