वैद्यकीय अध्यापकांचा प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार
नांदेड –
नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा माननीय पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासन श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात होणार असून या कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व अध्यापक बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी कळवले आहे.
यावेळेस बोलताना संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय मोरे यांनी सांगितले की मध्यवर्ती संघटनेच्या निर्देशानुसार आमचे असहकार आंदोलन चालू असून या आंदोलनाचा भाग म्हणून विद्यापीठाच्या सर्व प्रशासकीय कामावर बहिष्कार टाकलेला असून परवाच झालेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या मुलाखतीवर सुद्धा अध्यापकांनी बहिष्कार टाकल्याचे सांगितले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा शासनातर्फे कुठलाही विचार अद्याप पर्यंत झालेला नाही त्यामुळे सर्व अध्यापक वर्गामध्ये निराशेची भावना आहे.
यामध्ये मुख्यतः व आमच्या मागण्या सातव्या वेतन आयोगाचे भत्ते 2016 पासून देण्यात यावेत प्राध्यापकांचे समायोजन करावे त्या सर्व अध्यापकांनी कोरोना काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. 2005 नंतर शासन सेवेमध्ये आलेल्या सर्व अध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच सातव्या वेतन आयोगा मध्ये आश्वासित प्रगती योजनेचा समावेश असल्यामुळे त्याचा स्वतंत्र शासन निर्णय काढावा त्याप्रमाणे कालबद्ध पदोन्नती वेतन श्रेणी देण्यात यावी कंत्राटी शासन निर्णय शासनाने काढला होता तो ताबडतोब मागे घेण्यात यावा, महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अध्यापक परिचारिका व तांत्रिक कर्मचारी यांना जे शासन निर्णयानुसार मानधन मान्य आहे ते मानधन देण्यात यावे तसेच सर्व प्राध्यापकांना यशदाचे प्रशासकीय प्रशिक्षण यासाठी पाठवण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता हे आंदोलन चालू असून शासनामार्फत अजून याबद्दल काहीही करण्यात आलेले नाही.
यावेळी बोलताना संघटनेचे सचिव डॉ.मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की शासन स्तरावर अनेक वेळा मागणी करूनही शासन या बाबतीत कुठलाही विचार करत नाही सध्या तरी आम्ही रुग्णसेवा बाधित न होता आणि प्रशासकीय कामावर बहिष्कार टाकलेला आहे पण यापुढे जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.