नांदेडमद्धे खुनाचे सत्र सुरूच, 23 वर्षीय युवकाचा खून करून प्रेत झुडपात फेकले; शहरातील शिवनगर भागातील घटना

शहरात भीतीचे वातावरण

5,038

नांदेड-

शहराच्या इतवारा भागातील शिवनगर परिसरात राहणारा अमोल साबणे या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करून त्याचा मृतदेह इतवारा पोलीस ठाण्याच्या पशुवैद्यकीय रुग्णालय परिसरात असलेल्या झुडपात फेकून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी दि.29 एप्रिल रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली.

श्याम प्रभू साबणे रा.शिवनगर इतवारा नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आई वडील, बहीण, भाऊ असे सर्व जण एकत्र राहतात. रेल्वे स्थानकावर विविध कामे करून आपले जीवन चालवतात. 29 एप्रिल रोजी ते सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना भाऊ अमोल साबणे, वय 23 हा नैसर्गिक विधीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील झुडुपांमध्ये गेला असता पुन्हा घरी परतलाच नाही. मी कामावर गेलो. रात्री 10 वाजता मी घरी आलो. घरी विचारणा केली की, अमोल कामावर का आला नाही? तेंव्हा मला सांगण्यात आले की, तो सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेला आणि अद्याप परत आलाच नाही.

तेंव्हा मी आणि माझे अनेक मित्र घरी न आलेला भाऊ अमोल साबणे यास शोधण्यासाठी निघालो.मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात आम्ही अमोलचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत पशु वैद्यकीय दवाखान्याच्या झाडा झुडुपांमध्ये पडलेले आढळले. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केलेले होते. आम्ही इतवारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेंव्हा पोलीस आले.माझा भाऊ अमोल प्रभू साबणे यास कोणीतरी 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेदरम्यान मारून जखमी करून खून केला आहे. इतवारा पोलिसांनी याबाबत अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणांसाठी अमोल साबणेचा खून केला असा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शेख असद यांच्याकडे घटनेचा तपास देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला जवळपास एक महिन्याचा कालावधी होत असताना अद्याप या प्रकरणातील हल्लेखोर व सूत्रधारांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नसताना शहरात आणखी एक खून झाला आहे. त्यामुळे पोलिसांवर दडपण वाढत चालले असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.