नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीला अपघात, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने गाडीला दिली धडक; पोलिसांत गुन्हा नोंद

921

नांदेड –

लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीला एका खासगी बसने धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 23 डिसेंबर रोजी ही घटना घडली. यावेळी गाडीत कोणीही नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.

नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांचे पुतणे नरसिंग धारोजी हंबर्डे हे कपडे खरेदी करण्यासाठी लोहा येथे आले होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनी सेंटर येथे विधानसभा सदस्य असे स्टिकर लावलेली इनोव्हा गाडी क्रमांक.एमएच 26 सीडी 0909 दुकानाच्या परिसरात उभी करून ते खरेदीसाठी दुकानात गेले.त्याच वेळी नांदेडहून कंधारकडे जाणाऱ्या खासगी बस क्रमांक. एमएच 14 बीए 9574 चालकाच्या निष्काळजीपणामुळे चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली या खासगी बसने आमदार हंबर्डे यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली.यामद्धे गाडीचे मागचे इंडीकेटर फुटुन काही भाग दबला गेला आहे. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने गाडीत कोणीही नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी बस लोहा पोलिसांनी ठाण्यात लावली असून, चालकाला ताब्यात घेतले आहे. लोहा पोलीस ठाण्याचे कर्मचारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, लोहा शहरासह तालुक्यात लोहा, सोनखेड, माळाकोळी अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून भरधाव वेगाने बस अवैध प्रवासी वाहतूक करीत असतात.यात लोहा व सोनखेड हद्दीतून कंधारचे खासगी बस चालक भरधाव वेगाने गाड्या चालवतात. यातूनच हा प्रकार घडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.