बिहारमध्ये इयत्ता 7 वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख केल्याने नवा वाद
NEWS HOUR मराठी नेटवर्क |
बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्यात इयत्ता सातवीच्या सहामाही परीक्षेतील एका प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. बिहार शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 7 वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीरचा वेगळा देश असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल यांनी आरोप केला आहे की हे सर्व फक्त सीमांचलमध्येच का होत आहे? बिहार सरकार काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानत नाही.
सातवीच्या प्रश्नपत्रिकेत या देशांतील लोकांना काय म्हणतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये चीन, नेपाळ, इंग्लंड आणि भारतासह काश्मीरचा पर्यायही देण्यात आला होता. याचा अर्थ असा की पेपरमध्ये काश्मीरचा उल्लेख भारतापासून वेगळा देश असल्याचा केला आहे.
दरम्यान, यावर खुलासाही करण्यात आला आहे. बिहार शिक्षण मंडळाच्या सातवीच्या सहामाही प्रश्नपरीक्षेत असा प्रश्न होता की काश्मीरमधील लोकांना काय म्हणतात? हे चुकीने झाले असून ही एक मानवी चूक होती असे मुख्याध्यापक एस.के.दास यांनी म्हटले आहे. जायस्वाल यांनी फेसबुक पोस्टद्वारे आरोप केला आहे की, बिहार सरकारमधील पदाधिकारी आणि बिहार सरकार काश्मीरला भारताचा भाग मानत नाही. याचा पुरावा म्हणजे इयत्ता सातवीच्या प्रश्नपरीक्षेतील प्रश्न मुलांच्या मनात हे बिंबवण्याचे काम करत आहे. ज्याप्रमाणे चीन, इंग्लंड, भारत, नेपाळ हे एक देश आहेत त्याचप्रमाणे काश्मीर हेही एक राष्ट्र आहे.