“टेरर फंडिंग” प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात “पीएफआय”वर एनआयएचे छापे; नांदेडच्या देगलूर नाका भागातून एकजण एटीएसच्या ताब्यात

631

नांदेड –

नांदेडमद्धे आज सकाळी  दशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्ताला शहरातील देगलूर नाका भागातून ताब्यात घेतले आहे. मिराज अन्सारी असे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याचे देगलूर नाका इथे किराणा दुकान आहे अशी, माहिती मिळाली आहे.

टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात एनआयए, ईडीचे छापे सुरू आहेत.पीएफआय संघटनेचे पदाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे.महाराष्ट्रात टेरर फंडिंग प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्लीतून पीएफआयचे अध्यक्ष परवेझसह त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय पीएफआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) देशातील 10 राज्यांमध्ये छापे टाकले आहे. यादरम्यान 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रातही आज एटीएसचे पीएफआयविरुद्ध छापे संपूर्ण राज्यात सुरू असून त्यात औरंगाबाद, बीड, परभणी मालेगाव, मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, नवी मुंबईसह नांदेडचा समावेश आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नांदेडमध्येही देगलूर नाका भागात काल रात्री छापा मारुन मिराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून एटीएसकडून गोपनीय पद्धतीने ही सर्व कारवाई करण्यात येत आहे.

छापा दरम्यान अधिका-यांनी सांगितले की, एनआयएने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.अधिकार्‍यांच्या मते, हे छापे प्रामुख्याने दक्षिण भारतात टाकले जात आहेत. एनआयएने सांगितले की, दहशतवाद्यांना कथितपणे निधी पुरवणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना फसवणे यात गुंतलेल्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. एनआयएने याला आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले आहे.

महिनाभरा पूर्वीच नांदेडला एनआयए दिल्लीचे पथक पहाटे तीन वाजता धडकले होते. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवीसह अन्य तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर आता काल बुधवार दि.21 सप्टेंबर रोजी रात्री एनआयएच्या सूचनेवरून एटीएस पथक पुन्हा नांदेड शहरात दाखल झाले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी देगलूर नाका भागात छापा मारुन पीएफआयच्या मिराज अन्सारी याला ताब्यात घेतले असून रात्रीपासून एटीएस कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.