घटस्थापनेच्या दिवशीच नांदेडमद्धे तरूणीवर काळाचा घाला ! अर्धापूर तालुक्यातील पार्डीत ट्रक घरात घुसला; एक मुलगी ठार तर दोन मोटारसायकलीचा चुराडा (पहा व्हिडिओ)

10,346

सखाराम क्षीरसागर,

अर्धापूर, नांदेड |

आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काळाने एका तरुणीवर घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार अर्धापुरच्या पार्डी मक्ता येथे घडला आहे.

 

तालुक्यातील पार्डी मक्ता देळुब येथून नांदेड मुख्य रस्त्याकडे जाणारा भरधाव ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या माणिकराव मदने यांच्या पार्डी येथील घरासमोरील दोन मोटरसायकलला धडक देत घरात घुसला. धडक दिली त्या ठिकाणी घराचे स्नानगृह आहे. या स्नानगृहात त्यावेळी वर्षा माणिक मदने, वय 19 ही मुलगी स्नान करत होती. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्या मुलीस मृत घोषित केले. हा अपघात दि.25 सोमवार रोजी सकाळी 8 वा घडला असून या अपघातात दोन मोटरसायकलचा चुराडा झाला आहे.

 

या अपघातातील ट्रक क्रमांक एमएच-26, बीई 9193 पोलीसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघाताची माहीती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउनि साईनाथ सुरवशे, पोउनि कपील आगलावे, महेंद्र डांगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

 

दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्षा मदने ही नवोदय विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.तिने योग या विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. घटस्थापनेच्या दिवशीच आज ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे ट्रक चालकाविरोधात संताप व्यक्त होत असून पार्डी मक्ता गावात तरुणीच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.