ज्यांना “गांधी” प्रेम त्यांनाच केशवेची ॲलर्जी, हा तर ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार – प्राचार्य राजेंद्र केशवे
जयकुमार अडकीने –
माहूर, नांदेड –
ज्यांचे “गांधी” काँगेसवर प्रेम त्यांना केशवे काँग्रेसची ॲलर्जी हा तर ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार असल्याचे सनसनाटी टीकास्त्र माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी माहूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांवर सोडले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या माहूर नगरपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत सात सदस्य असलेल्या राष्ट्र्वादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास शिवसेनेच्या तीन सदस्यांनी पाठिंबा दिल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसला व उपाध्यक्ष शिवसेनेचे झाले असून माहूर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे यापूर्वी एकमेकाच्या मधून विस्तवसुद्धा आडवा जात नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडीवर जाहीर भाषणातून व सर्वत्र केशवे घराण्यावर जहरी टीका करण्यात येत आहे. हा राजकीय वाद आता केशवे व खराटे घराण्याचा व्यक्तिगत वाद बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नुकतेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आम्हाला काँग्रेस पक्षाचा राग नाही तर केशवे काँग्रेसचा राग असल्यानेच आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवले असल्याचे म्हंटले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते बोलत होते.
पुढे बोलतांना केशवे म्हणाले की, किनवट विधानसभा मतदार संघात माझे वडील नामदेवराव केशवे यांनी वयाच्या २२ व्या वर्षापासून कोणत्याही मोठ्या पदावर नसताना स्व.शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांना विविध पदाच्या माध्यमातून जनसेवेची व विकासासाठी योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देत राजकारण केले. स्वार्थासाठी कुठेही विचारांशी तडजोड केली नाही म्हणून गत सहा दशकापासून केशवे घराणे राजकारणात टिकून आहे.या उलट टीका करणाऱ्यांनी अनेक वेळा ज्या विचारातून आपले नेतृत्व घडले त्या विचारांना तिलांजली देत केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी परस्पर विरोधी भूमिका घेतल्या आहेत. राजकारण करीत असताना केशवे घराण्याने किनवट माहूर तालुक्यात अनेक भरीव विकास कामात योगदान दिले. त्यामध्ये माहूर तालुका निर्मिती, नगर पंचायत निर्मिती, स्वतंत्र पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे विभाजन करून माहूर व इस्लापूर स्वतंत्र कृषी उत्पन बाजार समिती किनवट- माहूर तालुक्यातील ९५ सेवा सहकारी सोसायट्या वाचविण्यासाठी केलेला पाठपुरावा किनवट माहूर तालुक्यात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी रोवलेले शैक्षणिक जाळे, माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करून तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून रोवलेली मुहूर्तमेढ, सहकार क्षेत्रासाठी दिलेले भरीव योगदान, केंद्रात भाजप सरकार असताना सुद्धा ना.नितीन गडकरी यांचे कडून आष्टा पडसा- रानिधानोरा रस्त्यास मंजुरी माहूर एसटी आगार आदिसह अनेक सार्वजनिक हिताच्या कामात भरीव कामात योगदान दिले आहे. याउलट केशवे काँग्रेसचा राग आहे म्हणणाऱ्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कोणतीही उल्लेखनीय विकास कामे केलेली दिसत नाही.
राजकारण करायचे ते केवळ स्वार्थासाठी हे सर्वश्रुत असून काँग्रेसचा नव्हे तर केशवेंचा राग आहे म्हणणारांचा हा प्रकार केवळ ताकाला जाऊन …..लपविण्याचा आहे. यांचे राजकारण म्हणजे आपले व्यवसाय चालविण्याच्या उद्देशाने डोळे लाऊन दूध पिण्याचा प्रकार आहे… केशवे परिवारावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तीगत टीका करून ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा हा प्रकार आहे. तेंव्हा केवळ जातीव्देष, धर्मद्वेषाचे राजकारण करून नेते बनलेल्यानी आपल्या राजकारणाचे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाला सार्वजनिक लाभ होण्यास योगदान काय? याचे आत्मपरीक्षण करूनच केशवे परिवारावर टीका करावी… अशी घणाघाती टीका माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी टीकेला उतर देतांना प्रसारमाध्यम प्रतिनिधीकडे केली आहे…