अर्धापुरातील निमगाव येथे आदिवासी कोळी महादेव समाजाचा २४ व्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

543

अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. यंदाही २४ एप्रिल २०२२ रोजी समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हास्तरीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्वीच्या हदगाव तालुक्यातील व आता नव्याने अर्धापुर तालुक्यात समावेश झालेल्या निमगाव येथे आदिवासी कोळी महादेव समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने आदिवासी कोळी महादेव समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गेल्या २७ वर्षापासून घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळा मध्यंतरी एक वर्ष अन्य कारणाने तर मागील दोन वर्षात कोरोनाचे संकट जगासहित देशातही वाढले होते, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील दोन वर्षे सामूहिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला होता, परंतु सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून २४ एप्रिल २०२२ रोज रविवारी १२:३१ ला २४ वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

निमगाव येथे आदिवासी कोळी महादेव समाज मोठ्या संख्येने असला तरी या समाजातील शासकीय सेवेतील संख्या बोटांवर मोजण्याएवढीच असून बाकी सर्व शेतकरी, शेतमजूर व अन्य रोजंदारीची कामे करणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे, यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने आणि त्यात मुलीचे लग्न करायचे म्हटले की अवघडच आहे, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती विकून अथवा कर्जबाजारी होऊन लग्न केल्याचे अनेक उदाहरणे आहेत, परंतु येथील आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी पुढाकार घेऊन गावात सामूहिक विवाह सोहळा घेण्याचे ठरविले, यामुळे पैसा व वेळ वाचला जात आहे.

येथे दरवर्षी २० ते २५ जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न होतो, विशेष म्हणजे अगदी वेळेवरच लग्न लावल्या जात असल्यामुळे व सर्व वऱ्हाडी, पाहुण्यांची उत्तम सरबराई करण्यात येत असल्याने येथील सामूहिक विवाह सोहळा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याची नाव नोंदणी चालू आहे, तेंव्हा गावातील व बाहेर गावातील विवाह इच्छुक समाज बांधवांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आदिवासी कोळी महादेव समाज बांधव व ग्रामस्थांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.