पालकांनो सावधान ! ऑनलाईन गेम पब्जी नंतर आता ‘फ्री फायर’चे वेड; 12 वर्षाचा मुलगा मोबाईल गेमच्या नादात चक्क नांदेडहून पोहचला नाशिकला
नांदेड-
ऑनलाईन मोबाईल गेममुळे अनेक गंभीर घटना, चित्रविचित्र प्रकार तसेच जीवावर प्रसंग बेतल्याचे आपण ऐकले व पाहिले आहे.अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. पब्जी या गेमची नक्कल असणाऱ्या ‘फ्री फायर’ या मोबाईल गेमच्या नादात नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील एक १२ वर्षीय मुलगा नांदेडहून चक्क नाशिकला पोहोचला आहे. या घटनेवरून ऑनलाईन गेमचे वेड ग्रामीण भागातील मुलांमध्येही किती रुजले असल्याचे पाहायला मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हरणाळा या लहानशा गावातील एका 12 वर्षीय मुलाला पब्जीची हुबेहूब नक्कल असलेल्या ‘फ्री फायर’ या गेमचे वेड लागले होते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असल्याने शेतकरी पालकांनी या मुलाला अँड्रॉइड फोन घेऊन दिला होता. ‘फ्री फायर’ गेमच्या माध्यमातून नाशिक येथील एका मुलाशी त्याची ओळख झाली. आणि या गेमच्या नादात तो नाशिक येथील मुलाला भेटण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हरणाळा येथून सकाळी नांदेड रेल्वेस्थानकावर बसने गेला आणि तेथून रेल्वे स्थानक गाठून नांदेड रेल्वेस्थानकावरून तपोवन एक्स्प्रेसने तो चक्क नाशिक रोड येथे पोहोचला.
मुलगा बराच वेळ झाला घरी परतला नसल्याचे पाहून त्याच्या पालकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. पण त्याचा पत्ता कुठेच लागला नाही अखेर वडिलांनी कुंटूर पोलिसात आपला मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नांदेड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा मुलगा नांदेड रेल्वे स्टेशन येथे पोहचून ‘तपोवन’ या ट्रेनमध्ये बसल्याचे रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरात निदर्शनास आले. दरम्यान, हा मुलगा नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.मुलाचा मोबाईल सुरू असल्याने त्याच्या लोकेशनवरून त्याचा लवकर शोध घेणे पोलिसांना शक्य झाले. या मुलासोबत खेळणारा व बोलणारा मुलगा त्याचा मित्रच होता की अन्य काही प्रकार या मागे आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
पब्जी गेमवर बंदी आली असली तरी पब्जीची हुबेहूब नक्कल असणारे ‘फ्री फायर’ सारखे अनेक गेम मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहेत. मुलांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या गेमबाबत सरकारने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय पालकांनी आपली मुले अशा गेमच्या नादाला तर लागत नाहीत ना, यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून उमटत आहेत.