सचखंड एक्सप्रेसला आरक्षित स्लीपर कोच न जोडल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखल्या प्रकरणी दमरेने दिले स्पष्टीकरण
नांदेड-
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी संख्या 12715 नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेसला दि.5 मार्च 2022 पासून एक स्लीपर कोच बदलून एक जादा थ्री टायर एसी कोच दिला आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्यांना या गाडीमध्ये पर्यायी डब्यांमध्ये किंवा जागा बदलून समायोजित केले जात आहे. दिनांक 5 मार्चपासून ही प्रक्रिया कोणत्याही तक्रारी शिवाय व्यवस्थित सुरू आहे.
दि. 22 मार्च मंगळवार रोजी S-9 क्रमांकाचा डब्बा जो आधी मूळ स्लीपर कोच होता तो बदलून थ्री टायर एसी कोच करण्यात आल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ उडाला व परिणामी प्रवाशांनी संतप्त होऊन दीड तास सचखंड एक्सप्रेस रोखली. S-9 डब्यातील 80 प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले होते त्यातील 73 कन्फर्म बर्थ प्रवाशांना पर्यायी जागा देण्यात आली तर अन्य 7 प्रवाशांना दुसऱ्या डब्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली.
याशिवाय 80 प्रवाशांमधील 47 प्रवाशांचा एक जत्था नांदेडहून करनालकडे एकाच डब्यातून जावू इच्छित होता.सदरील 47 प्रवासी इतर वेगवेगळ्या डब्यांच्या कोचमध्ये बसण्यास तयार नव्हते तेंव्हा रेल्वे प्रशासनाने या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून पार्सल व्हॅनच्या जागी स्लीपर कोच डब्बा लावून प्रवासांची गैरसोय टाळली.
नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस गाडी संख्या 12715 या गाडीसाठी दि. 9 मे 2022 पर्यंत आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांना स्वयंचलित सिस्टिमद्वारे पर्यायी स्लीपर क्लास कोचमध्ये आरक्षित जागा दिली जाईल, तरी प्रवाशांनी गाडी बसण्यापूर्वी याची खातरजमा करून पाहणी करावी असे दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रशासनाने कळविले आहे.