लोकप्रतिनिधी तापले, प्रशासन गारठले ! खा.चिखलीकर येताच प्रशासन गतीमान; माळेगाव यात्रेत फिरते शौचालय व स्नानगृह तात्काळ उभारण्याचे निर्देश

203

नांदेड –

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेच्या नियोजनात यंदा नांदेड जिल्हा परिषद प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यात्रेच्या सोयीसुविधा बाबत सुरुवातीला आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यानंतर आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी तापले आणि प्रशासन गारठले म्हणण्याची वेळ आली आहे.

माळेगाव यात्रा नियोजन नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती गेले आणि त्याची तारांबळ उडाली. यात्रापुर्व काळात निधी दिला नाही आणि कामांना अडथळा आला त्यामुळे प्रत्यक्ष यात्रा काळात असुविधेचा पाढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग या अधिकाऱ्यांचा कामाचा आढावा घेतला. जे झाले ते झाले पण उर्वरित काळात यात्रेत तात्काळ स्वच्छतागृह, तात्पुरते स्नानगृह तसेच घोडे बाजारात दगड-गोटे होऊ नये याची काळजी व सर्व यात्रेत पाणी मिळाले पाहिजे असा सूचना दिल्या आणि यंत्रणा कामाला लागली.

माळेगाव यात्रेत यंदा मोठी गर्दी आहे. शनिवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माळेगाव यात्रेत दाखल झाले. तातडीने यात्रेत होत असलेल्या गैरसोयी संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेत सुचना दिल्या.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, बांधकाम विभागाचे उप अभियंता बिरादार, इंजि शिवाजी राठोड, तसेच पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता, इंजि केंद्रे व महावितरण, पोलीस विभागांचे अधिकारी यांना यापुढे तीन दिवस यात्रेकरूंच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेतली जावी, अशा सूचना दिल्या. यात्रेत तात्काळ तात्पुरते स्नानगृह उभे करावे तसेच घोडा मैदान व इतर ठिकाणी दगडगोटे काढणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे संदर्भात सुचना दिल्या. खासदार चिखलीकर माळेगावात दाखल होताच प्रशासन गतीमान झाल्याचे दिसून आले.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माळेगाव यात्रा असे दृढ समीकरण आहे.खुद्द स्व.विलासराव देशमुख यांनी सन २००० मध्ये यात्रा नियोजनात प्रतापराव असावे लागतात तरच नियोजन लागते, असे जाहीरपणे सांगितले होते. त्याचा या दीड दशकात यात्रेकरू-व्यापारी यांना अनुभव आला आहे.जिल्हा परिषद सभापती ते खासदार या प्रवासात त्यांनी कायम माळेगाव यात्रा वाढीसाठी प्रयत्न केले, त्यामुळे यावर्षी झालेल्या प्रशासकीय कारभारातील गैरसोयी मुळे खासदार चिखलीकर यांना यात्रेकरू व ग्रामस्थांनी साकडे घातले. त्यांनीही दखल घेत माळेगाव ग्रामपंचायत येथे अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

मानकरी निवासस्थानाचे उद्घाटन

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यात्रेला तत्कालीन आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे सात कोटी रुपयांचा निधी मिळाला त्यातून मानाची रिसनगावचे नाईक यांच्या पालखीसाठी पालकी बांधण्यात आलेल्या मानकरी निवासस्थानाचे उद्घाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी सभापती आनंदराव शिंदे, माजी उपसभापती रोहीत पाटील, माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, मानकरी गणपतराव नाईक, संजय नाईक, चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, बालाजी राठोड, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सरपंच सुधाकर जायभाये यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.