नांदेडमधील यात्रेकरूंच्या कारला मध्यप्रदेशात भीषण अपघात; महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी

उत्तर भारतातील देवदर्शनासाठी गेले होते यात्रेकरू.

1,713
नांदेड –
नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत निष्काम योगी त्यागीनंद महाराजांसह पुणेगाव येथील काही भाविक उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्यातील देव दर्शनासाठी जात होते. देवदर्शनाला जात असताना यात्रेकरूंच्या कारचा मध्यप्रदेशमधील कटनी येथे भीषण अपघात घडला. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. या घटनेची माहिती पुणेगावातील नागरिकांना कळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
देवदर्शनासाठी जाणाऱ्यांमध्ये महंत त्यागीनंद महाराज, वय 52, बळीराम विक्रम पुयड, वय 48, दत्ता नागोराव पुयड, बालाजी जाधव माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतनकुमार व कारचालक संभाजी बालाजी जाधव या यात्रेकरूंचा समावेश आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात महंत त्यागीनंद महाराज आणि बळीराम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला तर रतनकुमार किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झालेल्या कारचा क्रमांक (एमएच 26, ए.के 7133) असा आहे.अपघातात कारचालक संभाजी जाधव किरकोळ जखमी झाला आहे. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह आज रात्री उशिरापर्यंत पुणेगाव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.