प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रकरणी पोलिसांकडून आणखी 2 आरोपींना अटक; आरोपीमद्धे नांदेडच्या एका व्यापाऱ्याचा समावेश
एकूण आरोपींची संख्या झाली नऊ
नांदेड –
दि.5 एप्रिल रोजी नांदेड शहराच्या शारदानगर भागात राहणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या निवासस्थानासमोर दोन अज्ञात इसमांनी तब्बल 11 गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विशेष तपास यंत्रणेकडून आज आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामद्धे नांदेड शहरातील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे. यापूर्वी सात आरोपींना पोलिसांनी अटक केलेली असून या हत्याकांड प्रकरणात आरोपींची एकूण संख्या आता 9 वर पोहोचलेली आहे. दरम्यान, आज अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना देखील 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून हे सातही आरोपी सध्या 10 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तर आज दि.4 जून रोजी अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना देखील 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी तपास करत असताना नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील कृष्णा धोंडीबा पवार, वय 28 आणि नांदेड शहरातील मारवाड गल्ली, वजीराबाद येथील हरीश मनोज बाहेती, वय 28 या दोघांना आज दि.4 जून रोजी अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखा आणि विमानतळ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे संजय बियाणी या हाय प्रोफाईल मर्डर केस प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी या प्रकरणात तपास करत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.