बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेली पल्सर दुचाकी पोलिसांनी केली जप्त

4,125

नांदेड-

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात अद्याप  9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मारेकऱ्यांनी या गुन्ह्यात वापरलेली व कुंटूर शिवारात जाळलेली पल्सर दुचाकी निष्पन्न झाली असून सदरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

9 आरोपींची पोलीस कोठडी दि.10 जून शुक्रवार रोजी संपणार असून पुढील तपास करण्याकरिता पोलीस कोठडीसाठी न्यायालयासमोर हजर करणार आहेत.येत्या दोन दिवसात या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोघांना अटक करणार असल्याची माहिती एस‌आयटीचे प्रमुख तथा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि निलेश मोरे यांनी सांगितली.

नांदेड शहरातील शारदानगर येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.तब्बल 55 दिवसाच्या तपासानंतर पोलिसांना या हत्येचा उलगडा करता आला.6 राज्यासह 4 देशात पत्रव्यवहार करून या तपासाची कडी जोडण्यात आली.पोलिसांकडून या प्रकरणात सर्वप्रथम 6 आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत पाठवले आहे.सध्या या हत्याकांड प्रकरणात एकूण 9 आरोपींची पोलीस कोठडी येत्या 10 जून रोजी संपणार आहे.

दरम्यान, पोलीस कोठडीतील तपासात हल्लेखोरांनी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकी ही कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.तीच दुचाकी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. लवकरच दोन आरोपी पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक करण्यात येईल असे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सांगितले आहे. खंडणी आणि दहशत याच कारणावरून संजय बियाणी यांची कुख्यात हरविंदरसिंग संधू उर्फ रिंदा याच्या सांगण्यावरूनच त्याच्या सहकार्‍यांकडून हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.