पुण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांमुळे राज ठाकरे आक्रमक; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”
NEWS HOUR मराठी |
पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं राज यांनी म्हटलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली आहे.
“एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे” असे राज यांनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटले आहे.”ही अटक कशासाठी झाली ? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत जर या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशाराही राज ठाकरे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना दिला आहे.
“माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही” असेही राज यांनी म्हटले आहे. “नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. भारतातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहाट्यांच्या मुठी जर आवळल्या तर यांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल” असे सूचक विधान राज यांनी केले आहे. “त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असे पत्राच्या शेवटी राज यांनी म्हटले आहे.