ऋषभ पंतच्या कारला अपघात झोपेमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे झाला अपघात; खरं कारण अखेर आले समोर..
नवी दिल्ली –
भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला दि. 30 शुक्रवार रोजी पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर डेहराडून येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संचालक श्याम शर्मा यांनी स्पष्ट केले की, ऋषभ पंतवरील उपचाराबाबत देशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. सध्या तरी त्याच्यावर डेहराडून येथेच उपचार होणार आहेत. यावेळी त्यांनी ऋषभ पंत याच्या कार अपघातामागील कारणही सांगितले.
यावेळी श्याम शर्मा म्हणाले की, “कारला अपघात हा ऋषभ पंतला झोप लागल्यामुळे झाला नाही. तर रस्त्यावर असणारा खड्डा चुकवत असताना ऋषभ पंतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.” दरम्यान, ऋषभ पंतची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) तीन सदस्यांनी भेट घेतली. यामधील एक कायदेशीर सल्लागारही होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ऋषभची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या डोके आणि पाठीचे स्कॅन करण्यात आले आहे. या तपासणीचे सर्व रिपोर्ट हे सामान्य आहेत. पंतच्या पायाला फॅक्चर आहे. याचेही सर्व रिपोर्ट सामान्य आहेत. त्याच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर मार लागला आहे.
पंतला सध्या तरी एअरलिफ्ट करण्याची गरज नसल्याचे शर्मा म्हणाले. त्याला सध्या दिल्लीला देखील हलवण्यात येणार नाही.लिगामेंट उपचारासाठी पंतला लंडनला नेले जाऊ शकते. मात्र याबद्दलचा निर्णय बीसीसीआय घेईल. पंतला कुठेही शिफ्ट करायचे असल्यास त्याविषयीचा निर्णय बीसीसीआयकडूनच घेतला जाईल.पंतला अजूनही वेदना होत आहेत. मात्र तरीही त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कायम आहे. बीसीसीआय सर्व डॉक्टरांच्या संपर्कात आहे, असे शर्मा म्हणाले.
पंतला झालेल्या दुखापती गंभीर नसल्याचे आतापर्यंतच्या वैद्यकीय अहवालांमधून समोर आल्याचे डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी सांगितले. पंत २ महिन्यांत मैदानात उतरेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा पंतला भेटायला देहरादूनला पोहोचले असून बीसीसीआय पंतच्या उपचारांसाठी सर्वोत्तम पर्यायांचा वापर करत असल्याची माहिती मनचंदा यांनी दिली.