देगलूर येथे दरोडेखोरांचा थरार ! वृद्ध दाम्पत्यास मारहाण, महिलेची हत्या करून चार लाखांचा ऐवज लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
गोविंद कंटोले,
देगलूर, नांदेड-
देगलूर शहर व परिसरात चोरट्यांचे सत्र सुरूच असून दि.23 सोमवार राेजीच्या मध्यरात्री उदगीर रोडवरील हॉटेल तरंगच्या बाजूस असलेल्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास केला.घरात वास्तव्यास असलेल्या वृद्ध दाम्पत्याना दाेरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करून चोरट्यांनी पोबारा केला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील उदगीर रोडवर शास्त्रीनगरमध्ये मूळ येडूर ता.देगलूर येथील रहिवासी श्रीपतराव रामजी पाटील वय 90 वर्ष हे त्यांच्या पत्नीसह वास्तव्यास होते.दि.23 साेमवार रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून, त्यांचे व त्यांची पत्नी चंद्रकला हिचे पाय व तोंड कापडाने बांधून मारहाण करून घरातील साडेबारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 70 तोळे चांदीचे वाळे असा एकूण 3,89,000 चा माल जबरीने चोरून नेला.सदर घटनेत फिर्यादीची पत्नी चंद्रकला श्रीपतराव पाटील वय 65 वर्ष ही मयत झाली आहे. रात्री उशिरा या घरातील आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेऊन ही माहिती पोलिसांना कळवली.
या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या आहेत. घटनेलगत असलेल्या तरंग बारच्या सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी केली असता घटनेदरम्यान त्यामध्ये 20 ते 25 वयोगटातील तीन तरुण मुख्य रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहेत.
याप्रकरणी पोलीस कसून तपास घेत असून श्रीपत पाटील यांच्या कुटुंबात खाजगी मालमत्तेवरून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणी देगलूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधात पथक रवाना केले आहे. या घटनेने देगलूरमध्ये खळबळ उडाली असून शहरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.