माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार

1,443
नांदेड –

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दि.24 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.25 गुरुवारी दुपारी 4 वाजता गोरठा, ता. उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आज दुपारी ४ वाजता गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार

भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. तसेच कार्यकर्त्यांचे मोठे जाळेही होते. मतदारसंघात त्यांची चांगलीच पकड होती. त्यामुळे भोकर तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्यासह जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. उमरी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी गोरठा येथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर गोरठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात निस्वार्थी, निष्कलंक व शब्दाला जागणारा नेता अशी ओळख..

जिल्ह्यातील राजकारणातील निष्कलंक, निस्वार्थी, धाडसी व्यक्तिमत्व, एक संघर्षयोद्धा, चारित्र्यवान, दिलेल्या शब्दाला जगणारा नेता तसेच जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पदे यशस्वीपणे निभावलेला एक आदर्श नेता म्हणून त्यांची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ, लोकनेते, माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, अशा शब्दांत सर्व स्तरातील नागरिक, राजकीय नेतेमंडळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा..

बापूसाहेब गोरठेकर यांचे वडील स्व.बाबासाहेब गोरठेकर हे देखील राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते. ते राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत बापूसाहेब यांनीही राष्ट्रावादीचा वसा घेतला. भोकर विधानसभा लढता लढता नायगाव विधानसभा निवडणूक लढवली त्या ठिकाणी मात्र त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला मात्र तेथे ते रमले नाहीत पुन्हा परत आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घरवापसी केली. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असून उमरी, भोकर तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

तत्वनिष्ठ आणि मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो : खा.प्रताप पाटील चिखलीकर
बापूसाहेब देशमुख गोरठेकर व माझे अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंधांचे संबंध होते. ते नातेवाईक होते. जिल्ह्यातील शब्द पाळणारे घराणे म्हणून गोरठेकर घराण्याकडे पाहिले जाते. बाबासाहेब देशमुख असतील किंवा बापूसाहेब देशमुख असतील यांनी दिलेला शब्द हा प्रमाण मानल्या जात. शब्दास प्रचंड किंमत देणार हे घराणं जिल्ह्यामध्ये हा असा एकमेव नेता की जो दिलेला शब्द पाळत होता. बापूसाहेबांच्या जाण्याने माझ्या वैयक्तिक जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील एक जाणता, जाणकार आणि समाजाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एक मार्गदर्शक आणि धुरंदर राजकारणी आपण गमावला आहोत अशा शोक भावना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.