सदाभाऊ, आधी हॉटेलच्या जेवणाची उधारी चुकवा, मगच पुढं जावा; भर रस्त्यावर हॉटेल मालकाने माजी मंत्री खोतांना अडवले

1,663

सांगोला, सोलापूर –

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील 66 हजार 460 रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा गाडीचा ताफा सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून जाब विचारला. ते कारमधून खाली उतरताच भाऊ आपला पैशाचा विषय मिटवा म्हणत अडवले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला.

यावेळी सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारवासारव करीत असतील पैसे तर देऊन टाकू असे म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हॉटेल मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेची सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.

पंचायत राज समितीच्या सांगोला दौऱ्यात काल दि 16 जून रोजी माजी मंत्री आ.सदाभाऊ खोत यांचे सांगोला पंचायत समितीच्या आवारात आगमन होताच ते कारमधून खाली उतरले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून अचानक मांजरी ता.सांगोला येथील मामाभाचा हॉटेलचे मालक अशोक शिनगारे यांनी त्यांना अडवले. भाऊ, माझे सन 2014 मधील हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा असे म्हणून त्यांना रोखले. अचानक या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष त्या दोघांच्या चर्चेकडे वळले.

यावेळी शिनगारे यांनी या बिलासाठी मी 8 वर्षे वाट पाहिली. मी सदाभाऊंना बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी मला लेका मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसलं बिल असे बोलून अपमानीत केले, असा आरोप केला. ते काही नाही माझ्या बिलाचा विषय मिटवा आणि मगच येथून जावा असे म्हणत मंत्री सदाभाऊना हॉटेल मालकाने जेवणाच्या उधारी बिलासाठी अडवले.

तुमच्या बिलासंदर्भात मला काहीच माहिती नाही, असे म्हणताच हॉटेल मालकांनी तुमचा मुलगा सागर याला सगळे माहीत आहे. मला कोणी समजवायचे गरज नाही असे ते म्हणाले. यानंतर भाऊंनी असेल बील तर देऊन टाकू असे म्हणून गर्दीतून काढता पाय घेतला आणि ते खाली मान घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले. यावेळी रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, प्रा.संजय देडामुख, शंभू माने यांनी हॉटेल मालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझे जे काय बील असेल ते आम्ही देतो परंतु गोंधळ घालू नको, असं यावेळी त्याला सांगितले. पण संतप्त झालेल्या हॉटेल मालकाने, तुम्ही यामध्ये पडू नका माझं मी बघून घेतो असा समज दिला.

यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी गर्दीतून अशोक शिनगारे यास समजावत तेथून घेऊन गेले. घडल्या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात सर्वजण काय झाले, कशाचा गोंधळ आहे म्हणून एकमेकांना विचारणा करीत होते. दरम्यान याबाबत आ.सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ खपाले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कसलेही बिल नाही.असते तर भाऊंनी ते कधीच भागवले असते. ही त्याची निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ सांगोला पंचायत समिती येथे येऊन माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाऊंनी संबंधीत अशोक शिनगारे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

विशेष म्हणजे, अशोक शिनगारे हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते होते. निवडणुकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदरमोड करून उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांच्याकडे थकीत आहे. वारंवार उधारीची मागणी करून‌ही उधारी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवून ‘आधी हॉटेलच्या जेवणाची उधारी द्या आणि मग पुढे जावा’ असं म्हणत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.‌

Leave A Reply

Your email address will not be published.