राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासंदर्भात शरद पवार यांचा मोठा खुलासा, वाचा काय म्हणाले..

1,042

NEWSHOUR मराठी नेटवर्क :

भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे. या पदासाठी विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याची शक्‍यता खुद्द पवार यांनी फेटाळून लावली आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मी नाही. मी राष्ट्रपतीपदाचा विरोधी उमेदवार असणार नाही, असे पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, विरोधी पक्ष उमेदवारीसाठी आवश्यक संख्याबळ गोळा करण्याची खात्री नसल्याने पवार फारसे उत्सुक नाहीत. हरणारी लढाई लढण्याची त्यांची इच्छा नाही, असेही सूत्रांकडून कळते.शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेनेला ते राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचे एकमताचे उमेदवार म्हणून हवे आहेत. सूत्रांनुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या गुरुवारी पवारांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंह यांचा संदेश घेऊन भेट घेतली. त्यांनाही फोन आला होता.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशीही चर्चा केली होती. तर काँग्रेसने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही संपर्क साधला होता. खरगे यांनी बॅनर्जी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.

देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. गरज भासल्यास त्यानंतर तीन दिवसांनी मतमोजणी केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच देशातील सर्वात मोठा राजकीय अनुभव असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अनेक आघाडी सरकार बनविण्याचे तसेच आघाडी तोडण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसची आघाडी घडवून आणत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष शरद पवार यांच्या नावावर सहमती दर्शवतील, अशी एकंदरीत स्थिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.