प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणातील शार्प शूटर पोलिसांच्या ताब्यात; हत्येचं गूढ उलगडणार ?

7,213

नांदेड –

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणातील शार्प शूटरला राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने ताब्यात घेतले आहे. संजय बियाणी हे नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. खंडणीसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचे आतापर्यंत झालेल्या तपासात पुढे आले आहे.

 

दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा असे या हत्या प्रकरणाच्या मूख्य सूत्रधाराचे नाव आहे. हरविंदर सिंग याच्याच सांगण्यावरून दोन शार्प शूटरनी संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन शार्पशूटर पैकी मुख्य असलेल्या दीपक सुरेश रांगा याला नेपाळ बॉर्डरवर पकडण्यात आले आहे.

 

संजय बियाणी यांच्यावर नांदेड येथील राहत्या घरासमोर 5 एप्रिल 2022 रोजी गोळीबार करण्यात आला होता. बियाणी यांच्या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. हत्येमुळे हवालदील झालेल्या बियाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांत्वन केले होते.

नेपाळ बॉर्डरवर ताब्यात घेण्यात आलेल्या दीपक सुरेश रांगा याच्यावर देशभरात विविध राज्यांमध्ये सुमारे 25 गुन्हे दाखल आहेत. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा त्यात समावेश आहे. बियाणी यांच्या हत्येनंतर त्याच्यावर आता महाराष्ट्रातही गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, बियाणी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीने राज्यासह देशभरातील विविध राज्यांमध्ये तपास केला. आतापर्यंत या प्रकरणात 15 जणांना अटक झाली आहे. या सर्वांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. इतक्या जणांना अटक होऊनही शार्प शूटर मात्र फरार होते. दरम्यान, त्यापैकी एका शूटरला गुजरात येथून अटक केली होती. जो सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणात तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

संजय बियाणी खून प्रकरणातील शार्प शुटरना अटक करण्यात आल्याने हत्येमागे नेमके कारण काय व कोण आहे ? याचा धागा पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींची संख्याही वाढू शकते. या प्रकरणात दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता. या हत्येचा खरा मास्टरमाईंड कोण ?  खंडणीसाठीच ही हत्या झाली की कोणाची सुपारी घेऊन हरविंदरसिंग रिंदा याने ही हत्या घडवून आणली? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरे या अटकेमुळे तपास यंत्रणांना मिळण्याची शक्यता आहे. बियाणी यांच्या हत्येतील शार्पशूटरला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील गूढ लवकरच उलगडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.