शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी ! अवघ्या काही मिनिटात महेंद्र गायकवाडला केले चितपट

389

पुणे –

पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत मूळचा राजगुरूनगर, पुणे येथील रहिवासी आणि नांदेड संघातून उतरलेला शिवराज राक्षे याने मंगळवेढा, सोलापूरचा महेंद्र गायकवाड याला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली. महेंद्र गायकवाडला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.

शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.

65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत उत्कंठा निर्माण करणाऱ्या – लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले. चांदीची गदा, पाच लाख रुपये रोख आणि महिंद्रा कंपनीची थार गाडी भेट म्हणून देण्यात आली. उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला चांदीची गदा, अडीच लाख रुपये रोख आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली.

तत्पुर्वी, झालेल्या माती विभागातील अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सोलापुरच्या सिकंदर शेखचा अटीतटीच्या लढतीत 6 विरुद्ध 4 गुणांनी पराभव केला. गादी विभागात 2020 सालचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. यात राक्षे 8 विरुद्ध 1 गुणांनी विजय मिळवित सदगीरला धक्का दिला.

गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं 8-1 असा एकतर्फी विजय मिळवला. शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या राक्षेवाडी (जि.पुणे) येथील आहे. तो वस्तात काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात करतो. महेंद्र गायकवाड हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातल्या शिरसीचा (जि.सोलापूर) आहे. हा पठ्ठयाही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. तो सुद्धा कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. दोन्ही मल्ल अंतिम फेरीत समोरासमोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.