नांदेडात पुन्हा गोळीबार ! पार्टीत मित्राकडून घात; खाण्यापिण्याच्या वादातून मित्रावर झाडली गोळी, शहरातील विमानतळ पोलीस हद्दीतील घटना

3,551

नांदेड –

गेल्या दोन वर्षांपासून नांदेड शहरामध्ये गोळीबाराच्या घटना ही सामान्य बाब झाली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसावा यासाठी प्रयत्न करीत असतानाही शहरामध्ये गोळीबारीच्या घटना घडतच आहेत.

शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुरी चौक माळटेकडी परिसरात चक्क मित्रानेच मित्रावर फायरिंग केल्याची घटना घडली आहे. यामद्धे एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना आज गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात शेख इरफान शेख गुड्डू, वय 25 राहणार मगदूमनगर, नई आबादी, नांदेड आणि त्याचा मित्र हे पार्टी करत होते. खाण्यापिण्याच्या कारणावरून दोघात वाद झाला. यावेळी आरोपी मित्राने शेख इरफान शेख गुड्डू याच्यावर आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यात शेख इरफान याच्या पोटात गोळी लागली आहे.

या घटनेची माहिती समजताच विमानतळाचे पोलीस अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.दरम्यान, जखमी शेख इरफान याला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली आहे.

नांदेड शहरात रिंदा गँगवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला बऱ्याच प्रमाणात यश प्राप्त झाले असले तरी शहरात अजूनही किरकोळ कारणावरून छोट्या-मोठ्या घटना घडतच आहेत. स्थानिक गुन्हे शाखा सातत्याने सतर्क राहूनही शहरामध्ये घटना घडत आहेत. नुकतेच पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व त्यांच्या टीमने अवैध पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली होती तर मागच्या शुक्रवारी दुपारी शहरातील जुना मोंढा भागातील राजा रणजितसिंह मार्केटसमोर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सराफा व्यापाऱ्यावर गोळीबाराची घटना घडली होती.पुन्हा एकदा या गोळीबारीच्या घटनेमुळे नांदेड शहर पुरते हादरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.