श्याम चांदणेने जिंकली माळेगाव येथील मानाची कुस्ती
श्रीक्षेत्र माळेगाव –
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती लोहा तालुक्यातील सावरगावचा श्याम निवृत्ती चांदणे या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी उमरा तालुका पालमचा अफसर अकबर पठाणची पाठ टेकवली. माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन सांगळे, उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटराव मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी शैलेश वाव्हळे, विक्रांत शिंदे, चंद्रसेन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हाजरी लावली होती. लाखो यात्रे करूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली.
माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाडाकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली.