कधी जावई, सासूबाई तर कधी मेहुणे; महाराष्ट्रातील हे ४ मुख्यमंत्री आपल्या जवळच्या नातेसंबंधामुळे आले अडचणीत !
NEWS HOUR मराठी डेस्क
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण कायमच चर्चेत आहे. विरोधी पक्षातील भाजपने विशेष करून विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडले आहे. त्यात ईडीने महाविकास आघाडीची पळता भुई केली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची धाड पडल्याने मुख्यमंत्री अडचणीत आल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात अनेक नेत्यांना व मुख्यमंत्र्यांना आपल्या नातेवाईकांनी अडचणीत आणले आहे. अनेक नेत्यांना या अडचणीमुळे आपल्या पदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे. नातेवाईकांमुळे कोणकोणते मुख्यमंत्री अडचणीत आले त्यावर एक नजर टाकू या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई झाल्याने उद्धव ठाकरे आता पुन्हा विरोधकांच्या रडारवर आले आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री चांगलेच अडचणीत सापडले आहेत असेच चित्र आहे. दरम्यान, आपल्या नातेवाईकांमुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही पहिले मुख्यमंत्री नाहीत. याआधी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांच्या सासूबाईंमुळे तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे आपल्या जावयामुळे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आपल्या मुलामुळे अडचणीत आले होते.
उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्याचे ११ प्लॅट ईडीने जप्त केले आहे. तर त्यांच्याशी संबधीत पुष्पक ग्रुपची तब्बल ६.४५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होते का ते पाहावे लागेल.
मनोहर जोशी
१९९५ नंतर महाराष्ट्रात शिवसेना व भाजप या युतीचे सरकार आले.स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे निकटवर्ती व निष्ठावान नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले. त्या काळात मनोहर जोशी हे शिस्तीचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात होते. मात्र या शिस्तीच्या राजकारणात नेमके नातेसंबध आडवे आले.मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर १९९८ साली आरोप झाले की त्यांनी त्यांचे जावई गिरीश व्यास यांना पुण्यातील शाळेचा आरक्षित भूखंड दिला. त्यावर एक १० मजली इमारत देखील बांधण्यात आली. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले की मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या पदाचा वापर करत पुण्यातील एका शोळेच्या नावे असलेला भूखंडाचे आरक्षण उठवून ती जमीन जावयाला दिली. या सर्व प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर खूप टीका झाली. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला व नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले.
विलासराव देशमुख
काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते होते. तसेच त्यांचा कार्यकाळ प्रगतीचा तसेच स्थिरतेचा जात होता, जेंव्हा काँग्रेसला गरज होती तेंव्हा तेंव्हा विलासराव देशमुख हे नेहमी पक्षासाठी धावून येत असत. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार यशस्वी करण्याचा फॉम्युला खरे तर त्यांनी दिला. मात्र या एवढ्या मोठ्या नेत्याला सुद्धा पुत्र प्रेमापोटी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला होता.
२००८ साली मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी प्रसिद्ध ताज हॉटेल दहतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. या घटनेत ताज हॉटेलचे मोठे नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या ताफ्यात बिगर सरकारी दोन व्यक्तींचा समावेश होता. त्या दोन व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याचे फोटो सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि एकच हलकल्लोळ उडाला. रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा यांना मुख्यमंत्र्या सोबत पाहून हा दौरा म्हणजे पर्यटन दौरा होता का अशी टिका विलासराव देशमुख यांच्यावर करण्यात आली.
यावेळी तत्कालीन गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारत व नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यावर देखील राजीनाम्यासाठी दबाव निर्माण करण्यात आले. अखेर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
अशोक चव्हाण
२००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला. काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. २००९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकली व पुन्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. पण हे मुख्यमंत्री पद त्यांना फार काळ उपभोगता आले नाही. २०१० मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ उठले. मुंबईतील कुलाबा परिसरात लष्काराच्या आरक्षित जमिनीवर रहिवासी इमारत उभी करण्यात आली आणि इमारतीचा म्हणजे आदर्श सोसायटीच्या फाईल्सला परवानगी देण्यासाठी तेथील तीन प्लॅट अशोक चव्हाण यांनी बेनामी आपल्या नावावर केल्या आहेत असा आरोप झाला. तसेच हे फ्लॅट त्यांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मा यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. या प्रकरणात अशोक चव्हाण यांच्यावर मोठी टीका झाली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.