जल जीवन मिशन अंतर्गत नळजोडणीची विशेष मोहीम; एकाच दिवशी 75 किलोमीटर पाईपलाईनला सुरुवात

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

464

नांदेड –

आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्‍त नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्‍या वतीने एका दिवसात नांदेड जिल्ह्यातील 15 गावांमधून जल जीवन मिशन अंतर्गत 75 किलोमीटर पाईप लेयींग करण्‍याच्‍या विषेश मोहिमेचा शुभारंभ राज्‍याचे सार्वजिक बांधकाम मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते शनिवार दिनांक 26 मार्च रोजी करण्‍यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, सरपंच व ग्रामस्‍थांशी पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅबिनेट हॉलमधून ऑनलाईन व्हिसीद्वारे संवाद साधला.

केंद्र व राज्‍य शासनाची जल जीवन मशीन ही महत्वकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागात घर तेथे नळ जोडी देवून नळाव्‍दारे प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. ही मोहिम गतिमान करण्‍यासाठी जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. येत्या 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्‍यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जल जीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्‍यात येत आहे. या अंतर्गत आज एकाच दिवशी 75 किलोमीटर पाईपलाईन टाकण्‍याच्या उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण म्‍हणाले, जिल्ह्यातील 1310 ग्रामपंचायत अंतर्गत 1205 ठिकाणी एक हजार कोटींची पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार आहे. गावपातळीवर सर्व यंत्रणांनी ही कामे दर्जात्मक करावी. मिशन मोडमध्ये ही कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, तरच ग्रामीण भागातील नागरीकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल. जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडण्याची धडक मोहीम जिल्ह्यात सुरू झालेली असून ही कामे निर्धारित वेळेत व दर्जात्मक करावीत असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण यांनी केले. जिल्ह्यात नुकताच जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. या अंतर्गत भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्याचा दृष्‍टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे व प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे ही काळाची गरज असून या उपक्रमासाठी जिल्हा परिषद विविध उपक्रम लोकसहभागातून राबविणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.