नांदेडच्या वैद्यकीय आणि आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर
नांदेड –
नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आज दि.9 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले.
नांदेडमद्धे मागच्या 40 दिवसांपासून वैद्यकीय अध्यापकांचे आंदोलन चालू असून त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले असून त्याप्रमाणे आज नांदेड येथे ही निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये सातव्या वेतन आयोगातील विविध भत्ते लवकरात लवकर मिळावेत व ते पूर्वलक्षी प्रमाणे मिळावेत, अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेले सहायक प्राध्यापक यांचे समावेशन व्हावे, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी तसेच आश्वासित प्रगती योजनाचा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करावा या आणि अशा विविध मागण्या करिता हे आंदोलन चालू असून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 14 मार्च पासून अध्यापक रुग्णसेवा बंद करतील असा इशारा देण्यात आला आहे.
यामध्ये आपत्कालीन सेवा व कोविड सेवा वगळण्यात आलेली आहे असे डॉ.संजय मोरे यांनी सांगितले. आज निवेदन देताना आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. मंगेश नळकांडे, डॉ.भास्कर पेरके, डॉ.संजय राठोड तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.समीर, डॉ.दुल्लेवाड ,जे.बी.देशमुख, डॉ.परसोडे, डॉ.मुळे, ऋषिकेश देशपांडे, डॉ.मादेवड, डॉ.सुधा, डॉ.हूमेरा, डॉ.सुवर्णा, डॉ.वैशाली, डॉ.नाजिया मॅडम इत्यादी सहभागी झाले होते.