दुचाकी व टिप्परचा विचित्र अपघात ! टिप्परखाली दुचाकी अडकून एक गंभीर; सिडकोच्या रमाईमाता चौकातील घटना
नांदेड –
नवीन नांदेड सिडको भागातील ढवळे कॉर्नरच्या रमाईमाता चौकात एका टिप्परने आज दि.7 शनिवारी दुपारी दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार टिप्परखाली अडकल्याने नागरिक व पोलिसांच्या मदतीने टिप्परखाली जॅक लावून त्यास बाहेर काढण्यात आले.सुदैवाने यात दुचाकीस्वाराचा जीव वाचला. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सिडकोच्या रमाईमाता चौकातील उस्माननगर रस्त्यावर दि.7 दुपारी सव्वा एकच्या सुमारास दुचाकी क्र.एम एच 26 बी.एस.3741 या दुचाकीस समोरुन येणाऱ्या एम एच 20 ई जी 9062 या हायवा टिप्परने समोरून जबर धडक दिली. यात रंगराव मोरोतराव पुयड रा.नागेली, वय 45 वर्षे हे दुचाकीसह टिप्परखाली अडकले.यामुळे पुयड यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर नागरीक व पोलिसांच्या मदतीने टिप्परच्या इंजिनला जॅक लावून जखमी पुयड यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
अपघात होताच घटनास्थळी नागरीक मोठ्या संख्येने जमा झाले होते.यामुळे नांदेड-उस्माननगर रस्त्यावर रस्त्यावर काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सहकाऱ्यांसोबत वाहतुक सुरळीत करण्यास मदत करून मार्ग मोकळा करुन दिला. जखमीला बाहेर काढल्यानंतर टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.