‘नीट’ परीक्षेतील अपयशाच्या भीतीपोटी विद्यार्थ्याची विष प्राशन करून आत्महत्या
गडचिरोली –
दुसऱ्यांदा दिलेल्या ‘नीट’ च्या परीक्षेत अपयश येईल या भीतीपोटी एका विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे घडली. हर्षद सदू तलांडे, वय 18 असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
हर्षद याने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर 2021 ला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा ‘नीट’ दिली होती. मात्र, कमी गुण मिळाल्याने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. यामुळे त्याने यंदा जुलै 2022 मद्धे दुसऱ्यांदा नीट परीक्षा दिली.19 ऑगस्टला नागपूरहून तो घरी परतला होता. पण यंदाही कमी गुण मिळतील, या भीतीने तो तणावात होता. याच भीतीने त्याने मंगळवारी सकाळी विष प्राशन केले. ही धक्कादायक बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्याला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले.
उपचारादरम्यान, बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे वडील शिक्षक असून आई ग्रामपंचायत सदस्य आहे.