लोहा शहरातील नियोजित जागेवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास प्रशासनाचा मज्जाव; पुतळा पालिकेने घेतले ताब्यात (पाहा व्हिडिओ)

पोलिसांनी पुतळा रोखल्यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन लोहा शहरातील बाजारपेठ बंद

1,203

प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड –

मागील अनेक कालावधी पासून लोहा शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी विविध आंदोलने संघर्ष केला. मात्र राजकीय श्रेयवाद व हेवेदाव्यातून आजपर्यंत नियोजित जागेत शिवस्मारक होऊ शकले नव्हते. परंतु पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोहा शहरात आणण्यात येवून त्याची नियोजित जागेत प्रतिष्ठापना करण्यासाठी वाहनातून घेवून जाताना लोहा बसस्थानकासमोर पोलिस प्रशासनाकडून सदर वाहनास अडविण्यात आले. जवळपास तीन तास शिवरायांचा पुतळा असलेले वाहन एकच ठिकाणी थांबले होते. असंख्य शिवप्रेमी तरुणांनी पुतळा नियोजित जागेत बसविणारच असा हट्ट धरल्याने प्रशासन धास्तावले होते. आ.श्यामसुंदर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रशासना सोबत चर्चा केली. परंतु निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने पुतळा नेण्यास हरकत घेतली. अखेर तीन तासानंतर पुतळा लोहा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या ताब्यात देवून पालिका प्रांगणात नेण्यात आला.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेत बसविण्यासंदर्भात मागील तीन दशकांपासून लोहा शहरात आंदोलन सुरू आहे. यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदर व आमदार दिवंगत भाई केशवराव धोंडगे यांनी पहिल्यांदा आंदोलन केले. त्यानंतर छावा संघटना, माजी आ.रोहिदास चव्हाण अशा अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले.खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली लोहा पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर पुतळा समिती गठीत करण्यात आली. शिवस्मारकासाठी बळीराजा हौसिंग सोसायटीची जागा रीतसर ताब्यात घेण्यात येवून स्मारकाचा चबुतरा बांधण्यात आला.परंतु दरम्यानच्या काळात खा. चिखलीकरांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले नगरसेवक शरद पवार हे अंतर्गत राजकीय कलहातून भाजपला रामराम ठोकत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिथूनच पुतळ्याच्या विषय अधिक गंभीर झाला. माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी शिव स्मारकासाठी बैठक घेवून निधी संकलित करून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा खरेदी करून दि.१ जानेवारीचा मुहूर्त साधत आयचार ट्रकने लोहा शहरात आणून नियोजित जागेवर बसविण्यासाठी घेवून जात असताना लोहा बसस्थानक समोरील खा.चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर येताच पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करत पुतळ्याचा ट्रक रोखला.

 

घटनेची माहिती मिळताच आ.श्यामसुंदर शिंदे, जि.प. सदस्य चांद्रसेन पाटील, कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार अशोक मोकले, पालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, पो. नि.संतोष तांबे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विक्रांत शिंदे, सपोनी गफार शेख, उस्माननगरचे भारती, पोउपनी मारोती सोनकांबळे, कंधारचे इंद्राळे आदीची उपस्थिती होती.

प्रशासनातील प्रमुख अधिकारी व आ.शिंदे, पुतळा नियोजन प्रमुख शरद पवार यांच्यामध्ये काही वेळ चर्चा होऊन शिक्षक मतदार संघाचे निवडणूक असल्याने आचार संहिता लागू करण्यात आली असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे तूर्त आपणास सदर पुतळा घेवून उभा करता येणार नसल्याचे सांगितल्याने आ.शिंदे, पवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात माघार घेतली. सदरील पुतळा लोहा पालिकेच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी पुतळा रोखल्यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन लोहा शहरातील बाजारपेठ बंद झाली होती.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, श्याम अण्णा पवार, नगरसेवक पंचशील कांबळे, गजानन मोरे पाटील, माजी नगरसेवक पंकज परीहार, उत्तम महाबळे, दत्ता पाटील दिघे, अनवर पठाण, माऊली पवार, सचिन कल्याणकर, गोविंद पहिलवान, सह बहुसंख्य तरुणांची उपस्थिती होती. शिवरायांचा पुतळा असलेले वाहन भररस्त्यात तीन तास उभे असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसआरपी सह आरसीपी असे एकूण तीन पलटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.