वानराच्या पिल्ल्याचे डोके अडकले तांब्यात; वनविभागाने वानरास दिले जीवदान (पाहा व्हिडिओ बातमी)
नांदेड-
बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी या गावात पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या वानराचे मुंडके एका तांब्यात अडकल्याने वन विभाग रेस्क्यू औरंगाबाद यांच्या अथक प्रयत्नानंतर त्या वानराच्या डोक्यात अडकलेल्या तांब्या यशस्वीरित्या काढल्यामुळे त्या पिल्ल्यास जीवदान मिळाले आहे.
वानराचे डोके तांब्यात अडकलेला व्हिडिओ
वन परिक्षेत्र देगलूर अंतर्गत येणाऱ्या बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथे १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता एक वानर प्रजातीचे नर पिल्लू पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आले होते. पाणी पिण्याच्या उद्देशाने एका घरा – समोरील तांब्यातील पाणी पिण्याचे प्रयत्न करीत असताना त्या तांब्यात त्याचे मुंडके अडकून बसल्याची बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी तात्काळ वन परिक्षेत्र देगलूर (प्रा) ला कळविले.
देगलूर वन परिक्षेत्र विभागाचे अधिकारी यांनी औरंगाबाद वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, नांदेडचे उपवनसंरक्षक केशव बाबळे, नांदेडचे सहाय्यक वनसंरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र देगलूर (प्रा) अधिकारी सागर हराळ, निखिल हिवरे हे वनपाल एस.एस.गेडाम, शेख फरीद तसेच वनरक्षक गजानन कलवार, गिरीश कुरुडे, ज्ञानेश्वर मुसळे, कैलास होनशेटे, माधव कुमारे, लक्ष्मण शिंदे, मारोती पानगटवार व वनमजूर गायकवाड, चव्हाण, बालाजी बत्तलवाड यांनी त्या वानराच्या पिल्ल्यास पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते वानर सापडले नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार औरंगाबाद येथील रेस्क्यू टीमचे कर्मचारी प्रकाश सूर्यवंशी, एस.के.गुसिंगे, विश्वास साळवे व पी.एम. अहिरे यांना पाचारण करण्यात आले.
सदर टीमने १८ जून रोजी पहाटे ५ वाजता घटनास्थळी दाखल होऊन बारा तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सदर पिल्ल्यास पकडण्यात सायंकाळी ७ वाजता यश आले. त्या वानर प्रजातीच्या पिल्ल्याच्या मुंडक्यात अडकलेला तांबा यशस्वीरीत्या बाजूला काढून त्या वानर प्रजातीच्या पिल्याला जीवदान देण्यात आले. अवघ्या चोवीस तासात रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करून वानर प्रजातीच्या पिल्यास जीवदान दिल्यामुळे परिसरातून वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.