सरकार गोरगरीब शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावतेय, माहूर तालुक्यात जुलै व सप्टेंबर पासून रेशनचा गहू, तांदूळ वितरण बंद; शेतकऱ्यांनी खायचे काय ?

315

बजरंगसिंह हजारी,                                                    माहूर, नांदेड –

अंगाची लाहीलाही करून उन्हाळ्यातील आग ओकनाऱ्या उन्हातान्हात आपल्या अंगाचा घाम गाळत, डोक्यावर बरसणाऱ्या पावसाळ्यातील पावसाच्या तीव्र धारा, अतिवृष्टी, महापूराचा सामना करत चिखल-माती-काटे तुडवत तसेच अंगात प्रचंड हुडहुडी भरवून शरिरातील रक्त गोठविणाऱ्या हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीत वर्षभर मातीत घाम गाळून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरविणारा जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांवर आज उपाशी राहण्याची गंभीर वेळ शासनाने आणली आहे. त्यांना मिळणारे गहू व तांदूळाचे वितरण गत जुलै महिन्यापासून हळूहळू बंद करण्यात आले आहे.

यासंदर्भात विचारणा केली असता, तालुक्यातील ३ हजार ८६७ शेतकरी लाभार्थी कार्ड धारक व त्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एकूण १४ हजार ५३४ एवढे लाभार्थी या योजनेपासून वंचित झाले असल्याची माहिती माहूर तहसील पुरवठा विभाग अव्वल कारकुन जुकंटवार यांनी दिली आहे. शासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ८८ हजार ६८० कार्डावरील ३ लाख ६५ हजार ५९३ तर तालुक्यातील माहुर शहराच्या ३८१ कार्डासह ग्रामीण भागातील ३ हजार ४८६ अशा एकूण ३ हजार ८६७ कार्डावरील शहरी १ हजार ५८० व ग्रामीणच्या १२ हजार ९५४ अशा एकूण १४ हजार ५३४ शेतकऱ्यांना देण्यात येणारे गहू व तांदूळ धान्याचे वितरण जुलैपासून हळूहळू बंद करण्यात आले आहे. सहा वर्षांपासून विभागातील शेतकरी ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असून आस्मानी संकटासोबतच बँकांचे व खाजगी सावकारांचे सुलतानी संकटात अक्षरशः होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आता आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

हीच परिस्थिती संपूर्ण मराठवाड्याची असून आठ जिल्ह्यांतील ५ लाख २७ हजार ४०० कार्डावरील २३ लाख ३१ हजार १०० शेतकऱ्यांना देण्यात येणारे गहू व तांदूळ धान्याचे वितरण बंद करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्यात आली असल्याच्या तीव्र संतापजनक प्रतिक्रिया शासनाच्या विरोधात व्यक्त केल्या जात आहे. देशात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य देण्याची तरतूद करण्यात आली.शेतकरी कुटुंबातील प्रति व्यक्तीला ५ किलो धान्य वितरित केले जात होते.दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वाटप जुलै महिन्यापर्यंत करण्यात आले.परंतु, जुलै महिन्यापासून गहू व पुढे सप्टेंबरपासून तांदूळ हे शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही.

एकीकडे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ओढवलेले आर्थिक संकट व दुसरीकडे त्यातून बाहेर निघण्यासाठी केलेली कर्जबाजारी यामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत आहे. त्यातच शासनाने धान्य देणे बंद केल्याने आता तिहेरी संकटात सापडला आहे.

माहूर तालुक्यातील एकूण कार्ड व लाभार्थी संख्या

कार्ड                       लाभार्थी

शहरी –    ३८१             १,५८०

ग्रामीण–  ३,४८६          १२,९५४

——————————————–
एकूण – ३,८६७          १४,५३४
——————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.