निसर्गाचा आघात! शेतातील झाडाखाली जेवणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर एक जखमी; लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील घटना

975

प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड –

तालुक्यातील माळाकोळी नजीक खेडकरवाडी जवळील रमणेवाडी शिवारात झाडाखाली जेवणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज कोसळून दोघे जण जागीच ठार तर एक जण जखमी झाले आहे. सदरील घटना दि.12 रोजी सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली.मयतामद्धे एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी जोरदार व नंतर दडी मारलेल्या पावसाने सुरवातीच्या कालावधीत शेतकऱ्यांना खुरपणी, निंदन, कोळपणी करू दिले नसल्यामुळे पिके तणात झाकली गेली तर काही अधिकच्या पावसामुळे करपली गेली. नंतर उघड दिलेल्या पावसाने पिके करपण्याच्या स्थितीत होते. पावसाळा अखेर परतीच्या जोरदार पावसाने शेत पिकांची वाट लावली. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

लोहा तालुक्यात सोमवारी दुपारी बहुतांश भागात मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटात पाऊस बरसला. माळाकोळी मंडळातील खेडकरवाडी नजीक रमणेवाडी शिवारात दि.12 रोजी सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान शेतातील कामे आटोपून दुपारच्या जेवणासाठी शेतातील झाडाखाली बसलेल्या कुटुंबियावर वीज कोसळून त्यात संगाबाई तातेराव केंद्रे, वय५५ रा. नागदरवाडी व रमणेवाडी येथील पांडुरंग कंधारे, वय ६५ यांचा जागीच मृत्यू झाला तर सारिका कंधारे या गंभीर जखमी झाल्या.

केंद्रे व कंधारे हे व्याही असल्याची माहिती असून ते शेती कामात केंद्रे यांना मदत करण्यासाठी आले होते अशी माहिती त्यांच्या एका नातेवाईकांकडून देण्यात आली. सदरील घटनेच्या माहितीस नायब तहसीलदार अशोक मोकले यांनी दुजोरा दिला असून याप्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.