महागाईच्या भडक्यात जनसामान्यांचे गणित कोलमडले ; तरी कोणत्याही निवडणुकीत भाजपचं बाजी मारते याचे गुपित काय ! 

भाजपविरोधी सर्व पक्ष व सामाजिक संघटना विचारमंथनात !

633

जयकुमार अडकीने,

माहूर, नांदेड –

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि यूक्रेन युद्धामुळे महागाईच्या भडक्याने तर कळसच गाठला आहे. यामुळे जनसामान्य माणसाचे पुरे गणितच कोलमडले आहे.

माहूर शहरात सध्या पेट्रोलचे दर एकशे बारा रुपयाच्या पुढे गेले आहेत तर डिझेल शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहे. यातच सोयाबीन, सूर्यफूल खाद्यतेल दोनशे रुपये प्रति किलोच्या दरात पोहोचले आहे. तसेच घरगुती सिलेंडर ही 50 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. आधीच कोरोनामुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले होते. त्यातच तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले. यामध्ये शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके, माती खरडून गेली. या संकटातून आता कुठेतरी जनजीवन पूर्वपदावर येत असताना रशिया-युक्रेन युद्धानंतर महागाईचा उडालेला भडका याचा जबर फटका सामान्य जनतेला बसला आहे.

जीवनावश्यक वस्तू पेट्रोल-डिझेल सिलेंडर या बरोबरच कडधान्ये, भाजीपाला, दूध, ज्वारी, गहू, तांदूळ, खाद्यतेल महागले आहेत. सर्व सण तोंडावर आले आहेत. गुढीपाडवा, रमजान, श्रीरामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती सणामागून सण सुरू होत आहेत. महागाईने जनजीवन कोलमडून गेले आहे. सामान्य माणसाने जगायचे कसे याचे कोडे पडले आहे. या सगळ्या महागाईचा फटका हॉटेललाही बसला आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे दरही वाढले आहेत. कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी अन् आता महागाई यामुळे शहरासह ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत व कोलमडून पडले आहे.

नोकर भरती बंद असल्यामुळे लाखो बेरोजगार तयार होत आहेत. यातच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत नाहीत. सगळे कामे आता मशीन मार्फत होत असल्यामुळे शिक्षण घेतलेले हजारो बेरोजगार तरुण कामधंदा पायी शहराकडे जात आहेत. मिळेल ते कामधंदा शोधून संसाराचा गाडा चालवण्यासाठी हातभार लावत असल्याचे तालुक्यात चित्र पाहावयास मिळत आहे.

गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात पुन्हा चुलीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे. शहरी व ग्रामीण भागात संसाराचा गाडा चालविणे ही मोठी कसरत होत आहे. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठविल्याचे दिसत नाही. हेच का मोदीचे अच्छे दिन असा सवाल केला जात आहे. असे असले तर गत वर्षी झालेली पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक वगळता प्रत्येकच विधानसभेच्या निवडणुकीत थेट जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या बाबतीत एवढी विपरीत परिस्थिती असताना भाजपाला मतदान करतो तरी कोण, करतो तर का करतो यामागचे गुपित काय याबाबत सर्व भाजप विरोधी पक्ष व विविध भाजप विरोधी सामाजिक संघटना कार्यकर्त्यांना सतावत असून सर्व विचारमंथनात गुंतलेले दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.