अर्धापुरच्या खैरगाव येथील शेतकऱ्याचा मुलगा गणित विषयात जे.आर.एफ.अवॉर्ड मिळवत देशात ११३ वा
अर्धापूर, नांदेड –
शेतात काबाडकष्ट करून कुटुंबाचा सांभाळ करीत असलेल्या खैरगाव येथील शेतकरी कुटुंबातील तरूणाने अर्थिक परिस्थितीशी दोन हात करून नियमित अभ्यास व अथक परिश्रमाने वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जे.आर.एफ.- नेट या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवित खुल्या प्रवर्गातून गणित विषयात देशात ११३ वा क्रमांक घेत जे.आर. एफ.अवाॅर्ड मिळविला आहे.
अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (म.) या छोट्याशा गावातील सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील चव्हाण यांचे भाचे व शेतीनिष्ठ शेतकरी माधवराव पवार यांचा सुपूत्र संदिप माधवराव पवार या मुलाने आपल्या कुटुंबातील अतिशय बिकट परिस्थितीला सामोरे जावून जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शालेय जीवनात अथक परिश्रम घेवून अभ्यास केला आणि आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने भारत सरकार शिक्षण मंत्रालयामार्फत वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) व विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जाणाऱ्या जे. आर.एफ.नेट या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात गणित या विषयात घवघवीत यश प्राप्त केले. तो खुल्या प्रवर्गामधून देशात ११३ व्या क्रमांकावर असून त्याने जे.आर.एफ.अवॉर्ड मिळविला आहे.
संदिप पवार या गुणवंत विद्यार्थ्यांने जे. आर. एफ. अवाॅर्ड मिळवून सिनियर प्राध्यापक या पदासाठी पात्रता मिळविली आहे. संदीपला पुढील काळात गणित विषयात संशोधनासाठी राष्ट्रीय फेलोशिप मिळणार आहे. त्याच्या या यशाचे हदगाव – हिमायतनगरचे आ.माधवराव पाटील जवळगावकर, जि.प.सदस्य के.सी.सुर्यवंशी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील चव्हाण, उत्तमराव पाटील पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष जेठणराव पाटील, बालाजी पवार, गोविंद भरकड, कचरू पाटील पवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ व अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या मुलाने शिक्षण क्षेत्रात केलेली प्रगती आणि त्याने मिळविलेले अवॉर्ड याची किंमत मला कळाली नाही. परंतू माझ्या काळ्या आईवर जिवापाड प्रेम करून रात्रंदिवस राबराब राबून काबाडकष्टातून केलेल्या अथक परिश्रमामूळे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अशाही परिस्थितीवर मात करून माझ्या संदिपने हे सुयश मिळविले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज माझ्या श्रमाचे मोती तयार झाले. याचा मला सार्थ अभिमान आहे.
– माधवराव पवार
संदिपचे वडील