मोलमजुरी करणाऱ्या आईच्या मुलाने स्वतःच्या शिक्षणाच्या खर्चासाठी पेपर टाकून दहावीत मिळवले 82 टक्के गुण
नांदेड –
नुकताच दहावीचा निकाल लागला आहे.या वर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. तर परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. नांदेड येथील शुभम कोडगिरवार त्यापैकीच एक आहे. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो पेपर टाकायचा. पेपर टाकून तो शाळेत जायचा, अभ्यासही करायचा. त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले असून त्याने दहावीत 82 टक्के गुण मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळी पाच वाजता उठायचे, पेपरच्या एजन्सीला जायचे, तिथून वर्तमानपत्राचे गठ्ठे उचलायचे आणि सायकलवर घरोघरी जाऊन वाटायचे असा शुभम संतोष कोडगिरवारचा दिनक्रम. काल दहावीचा निकाल लागला आणि शुभमला परीक्षेत 82 टक्के गुण मिळाले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेला शुभम सकाळी पेपर टाकून घरी येऊन मग शुभम शाळेत जायचा, अभ्यास करायचा. लहान वयात आपल्या परिस्थितीचे भान ठेवून त्यानुसार योग्य ती मेहनत घेणारे मुले समाजात बोटावर मोजण्या इतकीच ! शुभमने काम करून इतके गुण मिळवले आहेत जे खरेच कौतुकास्पद आहे.
दोन्ही भावंडांनी परिस्थितीची जाणीव ठेवून मिळवले यश
आपल्याला मुलाला शिकवण्यासाठी शुभमच्या आईने स्वतः तुटपुंज्या मानधनावर ग्रंथालयात काम केले. यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा शंतनू हा सुद्धा पेपर टाकून दहावीत 78 टक्के गुणांनी पास झाला होता. दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती. शुभमने सुद्धा लहान वयातच आईला हातभार लावायला सुरुवात केली.. आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: करण्यासाठी तो रोज सकाळी पेपर वाटत होता. आता त्याने दहावीचे शिक्षण नुसते पूर्ण केले नाही तर छानपैकी 82 टक्क्यांसह पूर्ण केले आहे. त्याच्या या कर्तृत्त्वामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आत्मविश्वास वाढल्याने शुभमने केली परिस्थितीतवर मात
शुभम संतोष कोडगिरवारच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून खूप कौतुक होत आहे. ज्या मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते, परिस्थितीवर मात करण्याची ज्यांची इच्छा आणि मेहनत करायची तयारी असते अशा मुलांना आयुष्यात योग्य त्या वेळी मदतीचा हात मिळणे गरजेचे असते. समाजातील दानशुर व्यक्तीचा मदतीचा हात मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, शिक्षिका, वृत्तपत्र विक्रेते बंडू अण्णा संगेवार यांनी शुभमचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.