गुप्तधनाच्या लालसेपोटी महादेव मंदिरातील पिंडीखाली खोदकाम करणाऱ्या तिघांच्या चोवीस तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

■ कुंटूर पोलिसांची मोठी कामगिरी

1,717

भगवान शेवाळे,                                             

बरबडा, नायगाव –

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे गुप्तधनाच्या लालसेपोटी महादेव मंदिरातील चक्क पिंड हटवून त्या पिंडी खालीच खड्डा खोदल्याचा संतापजनक प्रकार दि.7 रोजी बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी कुंटूर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर पंचतारांकितऔद्योगिक वसाहतीत फ्लेमिंगो मेडिसिन कंपनीच्या बाजूला असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिरात मंगळवारी गुप्तधनाच्या लालसेपोटी मंदिरातील महादेवाची पिंड बाजूला सरकवून त्याखाली मोठा खड्डा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते.

दरम्यान, बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन पथके स्थापन करून अज्ञात लोकांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना कुंटूर पोलिसांना दिल्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी, पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, संजय अटकोरे यांनी अवघ्या काही तासात मंदिरातील पिंडीखाली खोदकाम करणाऱ्या तीन संशयितांना पकडून त्यांच्याविरुद्ध चोरी करणे, धार्मिक भक्ती स्थळाचा अपमान करणे यासह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपींमद्धे अशोक विठ्ठल मैसनवाड, वय 45, बालाजी बाबू इरपे, वय 32, दोघेही रा.बरबडा ता.नायगाव आणि विष्णू आनंदराव डुकरे, वय 32 रा.कोरका पिंपळगाव ता. जि.नांदेड यांनी कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या महादेव मंदिरात दि.6 मंगळवारी रात्री गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. कुंटूर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा 158/22 कलम 379,511,295 भादवि कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश निखाते, पोलीस जमादार संतोष कुमरे, लक्ष्मण सोनकांबळे, मोहन कंधारे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक घुमे, रामेश्वर पाटील, होमगार्ड यश काळेकर आदींनी मोलाची कामगिरी बजावली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.